पुणे- शहरातील बावधन परिसरातील वाढते नागरीकरण व त्या भागातील नागरिकांच्या वाढत्या मागणीस प्रतिसाद देऊन भारतीय टपाल खात्यातर्फे बावधन मध्ये नवीन उपटपाल कार्यालय सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणी गोवा परिमंडळाचे चीफ पोस्टमास्टर जनरल अमिताभसिंग यांच्या हस्ते पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने रिमोटची कळ दाबून बावधन उपटपाल कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी पुणे क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये, डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस सिमरन कौर व पुणे शहर पश्चिम विभागाच्या प्रवराधीक्षक रिप्पन डुल्लेट आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन बावधन उप टपाल कार्यालयाचा पिनकोड ४११०७१ असून बावधन ब्रांच टपाल कार्यालयाचे नवीन बावधन उपटपाल कार्यालयामध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे.
नवीन बावधन उपटपाल कार्यालयात इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते, महिला सम्मान बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजना व इतरही पोस्ट ऑफिस बचत बँकेच्या योजना यांचा लाभ घेता येणार आहे. तसेच स्पीड पोस्ट, ई –बुकिंग, पार्सल इत्यादी बुकिंग सुविधेसह आधार नोंदणी व अद्यतन सेवा ही उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे. या कार्यालयाची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ असून सेव्हिंग बँक व इतर काउंटरच्या कामकाजाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत.
या पूर्वी आर्मामेंट उपटपाल कार्यालयास (४११०२१) जोडलेला भाग म्हणजेच शिंदे नगर, कोकाटे वस्ती, पाटील नगर, गुंडे वस्ती, देशमुख नगर, विज्ञान नगर, आमची कॉलोनी, बांदल ईस्टेट, बावधन बु/खुर्द, डी.एस.के. रानवारा, बालाजी सोलानी सो., बावधन पोलीस चौकी, वैकुंठ भूमी, सूर्यदत्ता कॉलेज, पुराणिक सो., चेलाराम हॉस्पिटल, ई. भाग आता नवीन बावधन टपाल कार्यालयाला जोडण्यात आलेला आहे.
तरी या भागात राहणाऱ्या नागरिकांनी बावधन टपाल कार्यालयास भेट देऊन आपल्या भागाचा पिनकोड तपासून घ्यावा व आपल्या संबंधिताना नवीन पिनकोड कळवावा जेणेकरून नागरिकांना येणारे टपाल विनाविलंब पोहचू शकेल, असे आवाहन करण्यात येत आहे.
टपाल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच बावधन भागातील नागरिक मोठ्या संख्येने बावधन टपाल कार्यालयात उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.