पुणे दि. १ जानेवारी २०२५ : पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील वेहेरगाव-कार्ला नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असे हे देवीचे जागृत देवस्थान मानले जाते. आज १ जानेवारी २०२५ नवीन वर्षाची नव्याने सुरूवात करत शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आई एकविरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या भगिनी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी उपस्थित होत्या.
‘हे नवीन वर्ष महाराष्ट्रासह देशाला सुख समाधानाचे, शेतकऱ्यांना न्याय देणारे असावे. त्यासोबतच सर्वांना आरोग्य, सौख्य, यश आणि विजयलक्ष्मी प्राप्त व्हावी’, अशी प्रार्थना यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आई एकवीरा देवीच्या चरणी केली. त्यानंतर, 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे नेत्रदीपक यश महायुतीला मिळाले त्याबद्दल एकविरा मातेचे त्यांनी नवस फेडले आणि श्रीफळ व प्रसाद देऊन त्या नवसाची पूर्तता केली. तसेच डोंगरावरील देवी माता आणि पायथा मंदिर या दोन्ही देवी आईंना साडी-ओटीचा नैवेद्य देखील डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अर्पण केला.
देवी संस्थान असलेले हे पायथ्याशी असणारे एकविरा मातेचे पायथा मंदिर म्हणूनही ओळखले जाते. तिथे आज नवीन वर्षाच्या सुरूवातीला दर्शनासाठी आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी होती. परंतु या सर्व गर्दीमध्ये जनतेने खूप चांगले सहकार्य देऊन अतिशय प्रेमाने डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. लोणावळा पोलिसांनी अगदी चोख व्यवस्था केलेली, असं मतही डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी याठिकाणी व्यक्त केले.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. मधुकर पडवळ, उद्योजक श्री. अशोक पडवळ, पोलीस पाटील श्री. अनिल पडवळ, मंदिर व्यवस्थापक श्री. संतोष देवकर, पुजारी श्री. तेजस तात्या खिरे आणि मा. सरपंच श्री. दत्तात्रय मारुती पडवळ उपस्थित होते.