पुणे – २०२४ आता मावळलंय.. २०२५ च्या सुर्योदयाकडे आशेने पाहत असताना गुन्ह्यांनी काळवंडलेल्या २०२४ कडे खरे तर मागे वळून पाहण्याची आवश्यक्यता नाहीच . कारण
नैनों से नैना जो मिला के देखे
मौसम के साथ मुस्कुरा के देखे
दुनिया उसीकी है जो आगे देखे
मुड़ मुड़ के न देख …
असे म्हणतात पण तरीही २०२५ च्या आगमनापूर्वीच २०२४ वर हलकीशी का होईना नजर गेल्याशिवाय राहत नाही . या वर्षात पुण्यानं अल्पवयीन मुले मोठ्या संख्येने गुन्हेगारीकडे वाळलेली पाहिली . कोयता गँग, पिस्टल, गावठी कट्टे अशा बंदुकांचा सुळसुळाट पुण्याला भयावह आहेच त्याबरोबर शहरात झालेले खून, खुनाचा प्रयत्न, महिलांविषयक गुन्हे , खुलेआम ड्रग्सची विक्री असे अनेक प्रकार सरत्या वर्षात पुणेकरांनी पाहिले . इतकंच नाही तर अशा अनेक घटना सुद्धा अधोरखित झाल्या की जिथे पुणे पोलिसांनी जिवाचं रान करून आरोपींच्या वेळीच मुसक्या आवळल्या तर कधी रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची परेड काढली गेली. पुण्यातील पोर्श अपघातासह अशा अनेक घटना घडल्या ज्याने संपूर्ण शहर हादरून गेलं. सरत्या वर्षातील कुठल्या अशा घटना आठवतात ते पहा
२०२४ ची सुरुवातच पुण्यातील या खळबळजनक घटनेने घडली. एकेकाळी कुख्यात गुंड मानला जाणाऱ्या शरद मोहोळ यांची त्यांच्याच घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आर्थिक वाद आणि जमिनीच्या वादातून झालेल्या हत्येने २०२४ हे वर्ष गुन्हेगारीचे असणार की काय याची चाहूल लागली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या आठ तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या मात्र शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवशी त्याच्या आयुष्याची दोरी कापली गेली आणि पुण्यातील गँग वॉर आता डोकं वर काढणार अशी भीती संपूर्ण शहराला बसली
१ सप्टेंबर रोजी पुण्यातील नाना पेठेत डोके तालीम परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा धारधार शस्त्राने वार करत आणि गोळीबार करत खून करण्यात आला. सुरुवातीला वनराज याचा खून कौटुंबिक कारणांनी आणि संपत्तीच्या वादातून झाला असं समजलं मात्र वर्चस्व वादातून हा सगळा प्रकार घडल्याचे पोलीस तपासातून समोर आलं. या घटनेने पुणे शहरात टोळी युद्ध पुन्हा जोर धरणार अशी चर्चा शहरातील प्रत्येक चौका चौकात ऐकायला मिळाली.
पुणे पोलीस आयुक्त पदाचा अमितेश कुमार यांनी स्वीकारला आणि पहिला दणका दिला. पुण्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी थेट पोलीस आयुक्त ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने १०,२० नव्हे तर तब्बल २६७ गुन्हेगारांची एकत्रित परेड काढली. फोफावलेल्या गुंडगिरीला चाप लावण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यांची परेड काढण्याची नामी शक्कल लढवली.पण …
पुण्यातील विश्रांतवाडी भागात मिठाच्या पुड्यात सापडलेले २ किलो ड्रग्स थेट एका अंतराष्ट्रीय ड्रग्स तस्कर आणि त्याच्या रॅकेट पर्यंत पोहचलं. राज्यसभरातील विविध ठिकाणी छापेमारी करीत पुणे पोलिसांकडून ४००० कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केलं. या संपूर्ण ड्रग्स तस्करीचा मास्टरमाईंड भारतात जन्मलेला मात्र परदेशात स्थायीत असलेला संदीप धूनिया हे स्पष्ट झालं. पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथे तयार झालेले ड्रग्स हा धूनिया फूड पॅकेट मधून लंडन आणि इतर ठिकाणी तस्करी करायचा. केंद्रीय यंत्रणांनी इंटरपोल ची मदत घेत धूनियावर रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे.
१८ मे २०२४, फक्त पुणे शहर च नव्हे तर देश, विदेशात ही तारीख ओळखली जाईल ती म्हणजे पोर्शे अपघातामुळे. पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन तरुणाने त्याच्याजवळलील भरधाव पोर्शे गाडी ने २ तरुणांचा जीव घेतला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली पण बाल न्यायलयाने या अल्पवयीन मुलाला ३०० शब्दांच्या निबंध लिहिण्याच्या अटी वर त्याची सुटका केली. आणि संपूर्ण देश पेटून उठला. यातील अनेक कंगोरे जसे जसे बाहेर आले तशी ही घटना गंभीर होत गेली. स्थानिक आमदाराचा पोलिसांवर दबाव, आरोपींचे रक्ताचे नमुने बदलणे, ससून रुग्णालयातील डॉक्टर यांनी आरोपींना केलेली मदत यामुळे या घटनेकडे एक चिड येणारी घटना म्हणून पाहायला गेलं. या प्रकरणात पैश्याचा जोरावर सगळं जिंकता येईल असं मानणारे अनेक जण आज ही येरवडा कारागृहात आहेत.माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरण
पुण्यातील चंदननगर भागातून वाहणाऱ्या मुठा नदीत एक मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे केले होते. ओळख पटू नये म्हणून या मृतदेहाचे शिर, धड वेगळं करून नदीत फेकलं होतं. पावसाळ्याच्या दिवसात नदीचा पाण्याचा वेग आणि व्याप्ती याचा फायदा घेत भावानेच अवघ्या १० बाय १० च्या रूम वरून स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा निर्घृण खून केला. तांत्रिक विश्लेषण आणि ह्युमन intelligence या दोन गोष्टींच्या जोरावर पुणे पोलिसांनी या घटनेचा तपास अतिशय शिताफीने केला.
ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या जवळ असलेल्या बोपदेव घाटामध्ये मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं तर दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीती पसरली हे ही तितकंच खरं. विरोधकांनी तर राज्याचे गृहमंत्री यांच्या राजीनाम्यासाठी अनेक आंदोलन उभी केली. निर्जळ भाग असल्यामुळे घटनास्थळी न सी सी टिव्ही न कुठले तांत्रिक विश्लेषण. खरा कस लागणाऱ्या या केस मध्ये पोलिसांनी ३ आरोपींना जेरबंद केलं.
लहान मुलींवर अत्याचार झालेले बदलापूर प्रकरण ताजे असताना पुण्यामध्ये देखील असाच संतापजनक प्रकार घडला. वानवडी भागातील एका नामांकित शाळेतील 8 वर्षांच्या दोन मुलींवर व्हॅनमध्ये व्हॅन चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना आणि पुणे शहर अक्षरशः पेटलं. सर्व स्तरातून टीका झाली, इतकंच काय तर काही तरुणांनी तर पोलीस ठाण्याच्या आवारात उभी केलेली ती बस फोडली. पोलिसांनी चालकाला अटक केली मात्र या घटनेमुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसच्या नियमांच्या उल्लघंनाचा प्रश्न देखील समोर आला.
पुण्यातील वाघोली परिसरात एका फुटपाथ वर झोपलेल्या ९ कामगारांना एका मद्यधुंद अवस्थेत भरधाव चालवत असलेल्या डंपर चालकाने चिरडलं. या अपघातात ९ जणांपैकी ३ जणांचा मृत्यू झाला ज्यामध्ये एक अवघ्या १ वर्षाची मुलगी आणि २ वर्षांचा चिमुरडा होता. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी डंपर चालकाला तात्काळ अटक केली. अमरावती वरून पुण्यात पोट भरण्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला.
या साऱ्या गुन्हेगारीच्या छायेकडे मागे वळून न पाहता
दुनिया के साथ जो बदलता जाये
जो इसके ढाँचे में ही ढलता जाये
दुनिया उसीकी है जो चलता जाये…
असे म्हणतच आता पुण्याला पुढे वाटचाल करत राहायची आहे.मागे झालेल्या दुर्घटना कशा टाळता येतील , गुन्हेगारीला पायबंद कसा घालता येईल, यश अपयश याची परवा न करता हे प्रयत्न चालूच राहतील
आये गये मंज़िलों के निशाँ
लहरा के झूमा झुका आसमाँ
लेकिन रुकेगा न ये कारवाँ…
म्हणत २०२५ ला आता प्रारंभही होईल .. तेव्हा …. गुन्हेगारीचा बिमोड करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांना …नवीन वर्षाच्या शुभेछ्या …