पुणे- शहरातील बेकायदा फलक आणि होर्डिंग लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, यासाठी पोलिसांना ११० जणांच्या नावांची यादी देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली आहे. महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छ अभियान’ अंतर्गत भारत सर्वंकष स्वच्छता मोहिमेसाठी एकाच वेळी सर्वच विभागांच्या टीम रस्त्यावर उतविल्या जात आहेत.
या टीमकडून स्वच्छता, अतिक्रमण हटविणे तसेच बेकायदा जाहिरात फलकांवर कारवाई केली जात आहे. काही भागांत ही कारवाई झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी खांबांवर आणि चौकांमध्ये पुन्हा जाहिरात फलक लावले जातात. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.
बेकायदा जाहिरात फलक लावल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये बेकायदा जाहिरात फलक लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच पोलिसांना देखील पार्टी करण्यात आले आहे.
महापालिका प्रशासनाने मागील काही महिन्यांमध्ये बेकायदा जाहिरात फलक लावल्याबद्दल संबंधितांवर विदूपीकरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्रे दिली आहेत. पोलिसांना नुकतीच ११० जणांच्या नावांची यादी दिली आहे. परंतु, पोलिसांकडून हे गुन्हे दाखल करण्यास विलंब होत आहे. पोलिसांनी महापालिकेच्या पत्रानुसार संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, यासाठी पोलिस आयुक्तांसोबत महापालिकेचा पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.