महात्मा फुले साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
सासवड : ” अंधश्रद्धा आणि अज्ञानात खितपत पडलेल्या समाजाला सत्याची वाट दाखविण्याचे महान कार्य करणाऱ्या महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची गावोगावी पारायणे होण्याची गरज आहे.” असे प्रतिपादन न्यायाधिश वसंतराव पाटील यांनी केले.
सतरावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे मोठ्या उत्साहात झाले, त्यावेळी संमेलनाध्यक्ष पदावरून श्री पाटील बोलत होते.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे माजी पोलीस अधिक्षक सुरेश खोपडे यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाले. यावेळी पुणे केंब्रिज स्कूल चे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कुंजीर, पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते गौरव कोलते, सासवडच्या माजी नगराध्यक्षा लताताई दिवसे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ लक्ष्मण हेंबाडे, सीताराम नरके, पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष उत्तम कामठे, ज्येष्ठ पत्रकार तानाजी कोलते, एम जी शेलार, खानावडीचे माजी सरपंच चंद्रकांत फुले, रमेश बोरावके, दत्ता होले, शरद यादव, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष गणेश ढोले, अरविंद जगताप आदी उपस्थित होते.
”पुरोगामी विचारांचा जागर झाल्याशिवाय समाज समृध्द होणार नाही, असे सांगून श्री पाटील म्हणाले, ” इंग्रज राजवटीत महात्मा फुले यांनी केलेले कार्य आणि मनुस्मृती च्या विरोधात घेतलेली भूमिका क्रांती करणारी आहे. भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून ज्ञानाची कवाडे खुली केली. पुरंदरची भूमी क्रांतीकारकांची आहे.
श्री सुरेश खोपडे म्हणाले, ” सद्या समाजमन अस्वस्थ असून, शिक्षणाचं खेळखंडोबा झाला आहे. जगण्यासाठी उपयुक्त असे शिक्षण मिळाले पाहिजे. माणूस शिकला तर शहाणा होईल. शिक्षणाचे महत्त्व ओळखून महात्मा फुले यांनी दोनशे वर्षा पूर्वी पुण्यात मुलींची शाळा सुरू केली. सध्याचे शिक्षण महाग आहे, गरीब लोक शिक्षणापासून वंचित राहावी जणू असेच धोरण राज्यकर्ते राबवीत आहेत. स्वस्त शिक्षणासाठी कुडाची शाळा हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव म्हणाले,” महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर व्हावा म्हणून सुरू केलेले हे संमेलन सतराव्या वर्षात पदार्पण करीत आहे, पुरंदर ही शूरवीरांची भूमी आहे. येथील माती इतिहासाने मंतरलेली आहे. शासनाने अशा साहित्य संमेलनाला अनुदान देण्याची गरज आहे. बांधावरच्या कवी, लेखकांना न्याय देण्याची भूमिका घेऊन साहित्य चळवळ उभी केली आहे.
यावेळी गौरव कोलते, उत्तम कामठे, निमंत्रक सुनील धीवार यांनी मनोगत व्यक्त केले. सुनीता निकम यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
संमेलनाच्या संयोजनासाठी राजाभाऊ जगताप, गंगाराम जाधव, सुनील लोणकर, श्यामकुमार मेमाणे, गंगाराम जाधव, अरविंद जगताप, दीपक पवार, संजय सोनवणे, मुकुंद काकडे, प्रफुल्ल देशमुख, राजेश काकडे, देविदास झुरुंगे आदीनी सहकार्य केले.
महात्मा फुले यांच्या मूळ खानवडीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी सहभागी झाले होते. .
प्रास्ताविक स्वागताध्यक्ष रवींद्र फुले यांनी केले. आभार निमंत्रक छायाताई नानगुडे यांनी मानले.
महात्मा ज्योतिबा फुले यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा गौरव करावा, असा ठराव संमेलनात मांडण्यात आला. तसेच खानवडी गावात सत्यशोधक विद्यापीठाची स्थापना करून महात्मा फुले स्मारकासाठी शंभर कोटी रुपयांचा आराखडा तयार करावा. अशी मागणी दशरथ यादव यांनी केली. कवी, लेखक व साहित्यिकांना शासनाने मानधन व एस्टी बस प्रवास मोफत करावा अशी दशरथ यादव यांनी केली.