भारतीय माजी सैनिक संस्थेची आकुर्डीत वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
पिंपरी, पुणे (दि. ३१ डिसेंबर २०२४) माजी सैनिकांनी ज्याप्रमाणे देशाच्या रक्षणासाठी सेवा केली. त्याचप्रमाणे सैनिकांनी सेवा निवृत्तीनंतर उद्योजक म्हणून कार्य करत; देशाचा आर्थिक विकास, सामाजिक उन्नती, प्रगती मध्ये हातभार लावावा असे मत जिल्हा सैनिक कल्याण केंद्राचे अधिकारी सतीश हिंगे यांनी व्यक्त केले.
भारतीय माजी सैनिक संघ, पुणे जिल्हा केंद्राची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, आकुर्डी खंडोबा मंदिर, सांस्कृतिक भवन येथे रविवारी (दि.२९) झाली. यावेळी बँक ऑफ बडोदाचे अधिकारी प्रवीण याज्ञिक, माजी उपमहापौर शैलजा मोरे, राजू मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे, ब्रिगेडियर डॉ. संजीव देवस्थळी (नि) बँक ऑफ बडोदा डिफेन्स बँकिंग ॲडवायसर , आयइएसएल, पीडीसी अध्यक्ष सुभेदार मेजर (नि) वाय. एस. महाडिक, उपाध्यक्ष डी. आर. पडवळ, सचिव डी. एच. कुलकर्णी, सहसचिव बी. एच. अबनावे, खजिनदार एम. एन. भराटे, सहसचिव व्ही. व्ही. निकम सदस्य डी. डी. लोहोकरे एस. डी. राजाराम, यु. डी. सुर्वे, कर्नल आर. ई. कुलकर्णी (नि), ले. कर्नल व्ही. व्ही. वेसविकर, श्याम परसोळकर वर्धा, कर्नल साहेबराव शेळके, कैलास जाधव, कमांडर (नि) रामसींग आदी उपस्थित होते.
माजी सैनिकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आहेत परंतु याची माहिती बहुतांश माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना नाही. ही माहिती माजी सैनिक संस्थेच्या वतीने सदस्यांपर्यंत पोहोचवावी. उद्योग व्यवसाय उभारणीसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या असून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मोठे स्वप्न बघून एकत्र येत उद्योग व्यवसायाची उभारणी केल्यास अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. माजी सैनिकांच्या बचत गटामार्फत अनेक व्यवसाय सुरू करता येतील. माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. या योजनांचा अधिकाधिक निवृत्त माजी सैनिक कुटुंबीयांनी फायदा घ्यावा असे आवाहन सतीश हंगे यांनी केले.
प्रारंभीच्या सत्रात संस्थेची ४१ वी वार्षिक सभा पार पडली. या सर्वसाधारण सभेत माजी सैनिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, त्यांना येणाऱ्या अडचणींची योग्य प्रकारे सोडवणूक व्हावी, संरक्षण विभागाच्या खडकी रूग्णालयात जाण्या – येण्यासाठी वाहतूक व्यवस्थेची सुविधा मिळावी, घर बांधणी, पाल्यांचे शिक्षण, आरोग्य यासाठीच्या योजनांचा फायदा मिळावा यासाठी प्रयत्न करावेत आदी बाबत सर्वानुमते ठराव संमत करण्यात आले.
भारतीय माजी सैनिक संघ ही माजी सैनिकांसाठी कार्य करणारी देशातील सर्वात जुनी नोंदणीकृत राष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेचे उद्घाटन १९६४ साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते तसेच जनरल थिमया व फिल्ड मार्शल करिअप्पा यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे करण्यात आले होते. महाराष्ट्रातील कार्यालय मुंबई आझाद मैदान येथे कार्यरत असून पुणे जिल्ह्यातील कार्यालय १९७८ पासून निगडी प्राधिकरण, सेक्टर २८ येथे संत ज्ञानेश्वर उद्यान येथे सुरू आहे. या संस्थेच्या माध्यमातून वृध्द माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा पत्नी, वीर माता-भगिनी तसेच माजी सैनिकांचे कुटुंबीय त्यांची मुले त्याच्या अनेक विविध प्रश्नांचे विनामूल्य निराकारण करण्यात येते, अशी माहिती सचिव डी. एच. कुलकर्णी यांनी दिली.
या सभेस निवृत्त सैनिक त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रशांत राजे, आभार खजिनदार सार्जंट एम. एन. भराटे यांनी मानले.