मुंबई-संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड दोषी नाहीत, तर मग तुम्ही पहिल्या दिवसापासून फरार का झाले होते? असा सवाल आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. हा गंभीर विषय महाराष्ट्रासमोर आल्यानंतर त्यातील गुन्हेगार आणि मास्टरमाइंड यांची नावे घेऊन मी सर्वांसमोर बोललो. आमच्या जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी सभागृहात विषय मांडल्यानंतर या विषयाचे गांभीर्य लक्षात आले, असे संदीप क्षीरसागर म्हणाले.
मी आजही मुख्यमंत्र्यांना याच विषयावर बोलण्यासाठी आलो होतो. वाल्मीक कराडवर खंडणी गुन्हा दाखल आहे. खंडणी आणि 302 या दोन्ही गुन्ह्यांमध्ये कनेक्शन आहे. हे प्रकरण अंडर ट्रायल चालवा आणि 302 मध्ये कटकारस्थान रचणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली. सीडीआरमध्ये ज्यांची नावे आली, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावे, अशी आमची आणि देशमुख कुटुंबाची मागणी आहे. तोपर्यंत धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा आणि तीन-चार महिन्यांनंतर पुन्हा शपथ घ्यायला लावावी. जिल्ह्यातील परिस्थिती लोकांच्या भावना पाहता धनंजय मुंडे यांनी नैतिकता दाखवून आपला राजीनामा द्यावा, अशी मागणीही क्षीरसागर यांनी केली.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सर्व पक्षाचे लोक होते. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार, सुरेश धस, प्रकाश सोळंके, विजय पंडीत, नमिता मुंदडा हे सर्व संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी, माणुसकीच्या नात्याने सभागृहात एकत्र आले होते. त्यामुळे या प्रकरणात कोणतेही राजकारण नाही, असे संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. वाल्मीक कराडने बीड जिल्ह्यात दोन जातींमध्ये तेढ निर्माण केला आहे. प्रामाणिक तपास झाल्यास सर्व गोष्टी समोर येतील, असे ते म्हणाले.
6 डिसेंबर, 9 डिसेंबर आणि 11 डिसेंबर असे गुन्ह्याचे क्रम आहेत. त्या आठ दिवसांचा सीडीआर तपासल्यास या प्रकरणात चौकशी थांबवण्यासाठी किंवा ही केस दाखल न होण्यासाठी अधिकाऱ्यांना कधी आणि किती वाजता फोन आलेत याची माहिती प्रशासनाकडे आहे. पोलिसांनी तपास करण्यासाठी सुट दिल्यास या मागचे सगळे मास्टरमाइंड सुद्धा समोर येतील, असा विश्वास संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.