पुणे-पाण्याच्या मुख्य जललाईनवरील बेकायदेशीर नळजोडणी घेतल्याने धायरी गाव व परिसरातील पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे वांरवार बेकायदा नळजोडणी तोडूनही अनेक समाजकंटक पुन्हा बेकायदा नळजोडणी करून मुख्य लाईनवरून पाणी घेत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा प्रशासन हतबल झाले आहे बेकायदा नळजोडणी घेणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत. बेकायदा नळजोडणी तातडीने तोडण्यात यावीत तसेच काढून टाकलेली नळ जोडणी पुन्हा करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी केली आहे.
या बेनकर यांनी पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले आहे.धायरीला पाणी पुरवठा करणाऱ्या बारांगणी मळा विहीर ते धारेश्वर मंदिर पाण्याची टाकी पर्यंत तसेच धनगर वस्ती लाईनवर बेकायदेशीर नळजोडण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकृत पाणी पुरवठा होणाऱ्या ग्राहकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे .पाणी कमी दाबाने येत आहे तसेच कधी दिवसाआड तर कधीकधी ३ ते ४ दिवसाने पाणी मिळत आहे. त्यामुळे एक लाखांवर रहिवाशांना
बाराही महिने तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
पाणी पुरवठा विभाग वरवर बेकायदा नळजोडणी तोडण्याची कारवाई करत आहे. मात्र बेकायदेशीर नळजोडण्या काढून टाकण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई येत नसल्याने पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे.याकडे आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,
बेकायदा नळजोडणी तोडण्याची ठोस कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यास जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. पाणीपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने होईल यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना येत्या १० दिवसांत कराव्यात.
अन्यथा पालिका कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे