पुणे, दि.३१: ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या वाचन पंधरवडा उपक्रमानिमित्त शासकीय विभागीय ग्रंथालय, शनिवार पेठ न.वि. गाडगीळ शाळा, पुणे येथे १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य सचिव तथा उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम शासन स्तरावर राबविण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे मार्फत स्वच्छता, ग्रंथ प्रदर्शन, वाचक सभासद नोंदणी यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे या कार्यालयातील नामांकित ग्रंथ, वर्तमान पत्रे व नियतकालिकांचे प्रदर्शन प्रामुख्याने भरविण्यात येणार आहे. तसेच दुर्मिळ ग्रंथांचे डिजीटायझेशन कशाप्रकारे करण्यात येते त्याचे प्रात्यक्षिकही यानिमित्त पहावयास मिळणार आहे. तरी सर्व वाचक सभासद, विद्यार्थी व नागरिकांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय विभागीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुरेश रिद्दीवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.