उस्ताद डागर बंधु यांच्या हस्ते एमआयटी सांस्कृतिक संध्याचे उद्घाटन
पुणे, दि. ३१ डिसेंबर: ” सांस्कृतीक संध्या ही संगीताच्या साधनेतून शांतरसाची अनुभूती देणारी आहे. त्यातूनच प्रत्येकाला ईश्वरीय दर्शन घडते. वैश्विक भारतीय संस्कृती ही मानवतावादी आहे. आजच्या तरुण पिढीला भारतीय संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. त्यांच्यामध्ये भारतीय संस्कृती रुजविण्यासाठी भारतीय संगीत महत्वाची भूमिका बजावत आहे.” असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे लोणी काळभोर येथील विश्वराज बंधारा, विश्वशांती गुरूकुल, राजबाग येथे आयेाजित केलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सावाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उस्ताद नफीसुद्दीन डागर व उस्ताद अनीसुद्दीन डागर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हेाते. तसेच पं. उध्दवबापू आपेगांवकर, विश्वशांती कला अकादमीचे महासचिव आदिनाथ मंगेशकर, दूरदर्शनेचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण आणि प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” भारतीय युवक ज्या मार्गाने जात आहे तो योग्य नाही. येथील संस्कृती ही सर्वश्रेष्ठ असून ती विश्वशांतीचा मार्ग दाखविणारी आहे.”
डॉ. मुकेश शर्मा म्हणाले,” भारतीय संस्कृती ही संस्कार देणारी आहे. नव वर्षात प्रवेश करतांना आपण संस्कृतीचे जतन करावे. संगीत साधना ही सर्व शास्त्रांमध्ये सर्वोच्च आहे. यात नाद व ताल आहे. ही संगीत संध्या नसून संस्कृती आहे.”
या संगीत महोत्वसावाच्या उद्घाटनानंतर भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर विश्वशांती संगीत अकादमीचे विद्यार्थ्यांनी शिव वंदना आणि गणेशवंदना सादर केली. प्राचार्या श्रेयसी पावगी यांचे गायन झाले. त्यानंतर ज्येष्ठ व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये यांचे व्हायोलिनवादन झाले. तसेच ज्येष्ठ गायिका कल्याणी बोद्रें यांचे गायन आणि मा. उस्ताद नफीसुद्दीन डागर व उस्ताद अनीसुद्दीन डागर यांचे धृपद गायन झाले. यांना पखवाजवर पं. उद्धवबापू आपेगांवकर यांनी साथ संगत दिली.
आदिनाथ मंगेशकर यांनी स्वागतपर भाषण केले.
डॉ. संजय उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले.