मुंबई-बीडच्या संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी फासावर लटकेपर्यंत पोलिस स्वस्थ बसणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. बीडच्या प्रकरणात आम्ही कुणालाही सोडणार नाही. या प्रकरणात ज्याचा संबंध ज्या प्रकरणात आढळेल त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. आम्ही गुंडांचे राज्य चालवू देणार नाही. कुणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही व खंडणी मागता येणार नाही, असे ते म्हणालेत.
बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड आज अखेर सीआयडीपुढे शरण आला. त्याने पुणे स्थित सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले. त्याची सध्या चौकशी सुरू आहे. वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी भाष्य करताना बीडच्या प्रकरणात कुणालाही सोडणार नसल्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, बीडच्या प्रकरणात आम्ही कुणालाही सोडणार नाही. या प्रकरणात ज्याचा संबंध ज्या प्रकरणात आढळेल त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. अतिशय कडक कारवाई केली जाईल. गुंडांचे राज्य आम्ही चालवू देणार नाही. कुणालाही या प्रकरणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही. खंडणी मागता येणार नाही. त्या दृष्टिकोनातून तपास अतिशय गतीशिल करण्यात आला आहे. त्यामुळेच त्यांना शरणागती पत्करावी लागली आहे.
या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके सक्रीय झाले आहेत. सरकार कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. सर्वांचा शोध घेतला जाईल. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माझी फोनवरून चर्चा झाली आहे. मी त्यांना काळजी न करण्याची ग्वाही दिली. यासंबंधी काय वाटेल ते झाले तरी सर्व दोषी शोधून ते फासावर लटकेपर्यंत पोलिस स्वस्थ बसणार नाहीत असा विश्वास मी त्यांना दिला आहे, असे ते म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, कोणता गुन्हा दाखल होईल, कसा होईल हे पोलिस सांगतील. हे पोलिसांचे काम आहे. प्रस्तुत प्रकरणात पुराव्यांच्या आधारावर कुणालाही सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितले आहे. यासंदर्भात पोलिस वेळोवेळी निर्णय घेतील. वेळोवेळी ब्रीफिंग करतील. ही केस जाणिवपूर्वक सीआयडीला देण्यात आली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्ता देण्यात आली आहे. त्यांच्यावर कुणाचाही दबाव चालवून घेतला जाणार नाही. कुणालाही दबाव टाकू दिला जाणार नाही.
वाल्मीक कराडने एका व्हिडिओत आपल्यावरील आरोप फेटाळलेत. तसेच आपल्यावर राजकीय द्वेषापोटी कारवाई केला जात असल्याचा दावाही केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर बोलताना म्हणाले, कुणी काही म्हणत असले तरी पोलिस जो काही पुरावा आहे त्या पुराव्याच्या आधारावर कारवाई करतील. त्यामुळे व्हिडिओत कोण काय म्हणत आहे किंवा काय म्हणत नाही याचा विषयच नाही. जिथे पुरावा आहे, त्याला सोडले जाणार नाही हा विषय आहे.
पत्रकारांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी होणाऱ्या मागणीविषयी विचारले. त्यावर ते म्हणाले, मला या प्रकरणाच्या राजकारणात जायचे नाही. मी पूर्वीपासूनच सांगत आहे की, प्रस्तुत प्रकरणात कुणाकडे पुरावे असतील तर द्यावे. माझ्यासाठी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी कारणीभूत असणाऱ्या लोकांना शिक्षा होणे हे महत्त्वाचे आहे. काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचे आहे. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभो. त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की, फार फायदा होईल. मला त्यात जायचे नाही. मला त्याचे समर्थनही करायचे नाही किंवा विरोधही करायचा नाही. त्यांनी त्यांच्या ठिकाणी राजकारण करावे. पण संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा ही आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे.