पालघर दि. ३० : पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीवर विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय ५५ वर्ष रा. खानापाडा याच्यावर गुन्हा रजिस्टर क्र. २९१/२०२४ नोंदवण्यात आला आहे. सदर आरोपीचे किराणा मालाचे दुकान आहे.आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीला दुकानामध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केले.
रविवार दि. २९ डिसेंबर २०२४ रोजी ही मुलगी दुकानात गेली असता आरोपीने तिच्यासोबत अश्लील चाळे केले, त्यामुळे घडलेला प्रकार मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितला. यानंतर पालकांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला . ‘आरोपीचे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासवणारे आहे, अशा नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी’, असे निर्देश या प्रकरणाबाबत शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी श्री.बाळासाहेब पाटील , पालघर पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.
सदर घटनेचा तपास लवकरात लवकर करुन संबंधित मुलीला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यात यावा असं म्हणत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही यावेळी दिलेल्या आहेत.
घटनेचा तपास अधिक जलदगतीने करावा व आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी. आरोपीला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करणे त्याचबरोबर जामीनास कसून विरोध करण्यात यावा. पीडित मुलीचे समुपदेशन व शालेय शिक्षण चालू राहण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.