पुणे, दि. ३०: विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली. यावेळी पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, उप विभागीय अधिकारी यशवंत माने आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी विजयस्तंभाचे सुशोभीकरण, गर्दी व्यवस्थापन, रांगा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने केलेले नियोजन, आजूबाजूच्या जागेचे सपाटीकरण तसेच उभारण्यात येत असलेली शौचालये, उभारलेले पेंडाल, पोलीस सूचना मनोरे आदींच्या उभारणीची तयारी आदीची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या. उपस्थित विविध संघटनांचे प्रतिनिधींशीही त्यांनी संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या.
जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पेरणे (ता. हवेली) पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी १ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय येत असतो. याठिकाणी येणाऱ्या वाहनांकरिता तात्पुरत्या स्वरुपात वाहनतळ उभारण्यासाठी तसेच अन्य बाबीसाठी खासगी मालकीच्या मोकळ्या मिळकती तात्पुरत्या स्वरुपात २ जानेवारी २०२५ पर्यंत अधिग्रहित करण्यात आल्याचे आदेश प्रा. जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत.
जयस्तंभाजवळ वाहनांची मोठी गर्दी होऊ नये यासाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ६५ अन्वये प्रभारी जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पाटील यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार मौजे वढू खुर्द ता. हवेली येथील गट क्र. १४४ मधील अनिल रामचंद्र चोंधे व इतर यांचे क्षेत्र ३.०३ हे. आर ‘शेतकरी मिसळ’ शेजारील जागा मिळकत अधिग्रहित करुन अनुयायांच्या वाहनांसाठी वाहनतळ म्हणून वापरण्यात येणार आहे.
विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने उभारण्यात आलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी वाहने बंद पडल्यास किंवा अपघात घडल्यास तात्काळ वाहनांना हलविण्याकरीता उत्कृष्ट क्षमतेचे क्रेन्स अधिग्रहन करण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी आदेश जारी केले आहेत.
वफ्फ बोर्ड वाहनतळ, अहिल्यानगर मार्ग, शिक्रापूर, टोरंट गॅस वाहनतळ, चाकण रोड, जातेगाव खुर्द, चाकण चौक, शिक्रापूर, सणसवाडी चौक, हॉटेल ग्रीन गार्डन पिकअप पाईंट, डिंग्रजवाडी कोरेगाव भिमा, कोरेगाव भिमा बाजारतळ आणि महाराणी येसूबाई कमान वढू बु या ठिकाणाकरीता 10 क्रेन्स अधिग्रहण करण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.