पुणे- अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केलेली तक्रार राज्य महिला आयाेगास ईमेलद्वारे प्राप्त झाली आहे. याबाबत संबंधित पोलिसांना चाैकशी करुन त्याबाबत कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयाेगास सादर करण्याचे सूचना दिल्या आहे, अशी माहिती राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकारांना दिली आहे.त्याच बरोबर करुणा मुंडे यांच्यादेखील तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारी या पुण्यातील येरवडा पोलिस स्टेशन व संगमनेर पोलिस स्टेशन यांच्या हद्दीतील हाेत्या. नवीन पक्ष स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेऊन दाेनजणांनी फसवणुक केल्याची तक्रार घेतली आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली. येरवडा येथे काेणीतरी त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी केली त्याबाबत करुणा मुंडे यांना कारवाई करुन न्याय दिला गेला. त्यांची तिसरी तक्रार धनंजय मुंडे यांच्याबाबत असून ती मी न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही असे चाकणकर यांनी सांगितले.
चाकणकर म्हणाल्या,’ महाराष्ट्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या सुमारे ३५ टक्के आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षा मिळविण्यासाठी आम्ही समितीच्या माध्यमातून उपाययाेजना राबवत आहे परंतु त्यात आम्हाला फारसे यश अद्याप मिळाले नाही. समितीकडे तक्रार नाेंदवणे, व संबंधित आराेपीकडून आणखी त्रास हाेईल यामुळे महिला तक्रारीस पुढे येत नाही. विविध क्षेत्रात महिला कार्यरत राहून अग्रेसर राहत आहे. परंतु साेशल मिडियाच्या माध्यमातून महिलांचे चारित्र्य हनन तक्रारी वाढल्या आहे. मागील तीन वर्षात आयाेगाकडे ३० हजार ७५५ तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी ३० हजार ३४७ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहे. ४०८ कारवाईसाठी हाेत्या व त्यावर मागील दाेन महिन्यात कारवाई करण्यात आली आहे.
चाकणकर म्हणाल्या, साेशल मिडियाच्याद्वारे एखाद्या महिलेचे किंवा तिच्या कुटुंबाचे फाेटाे माॅर्फ करुन अश्लील पाेस्ट करुन टीआरपी वाढविण्यासाठी वेगवेगळे कॅप्शन देऊन युटयुबद्वारे प्रसारित केले जातात. यामध्ये संबंधित कुटुंब व व्यक्तीवर विपरीत परिणाम हाेताे व सदर महिलेचे चारित्र्य हनन हाेते यामुळे नैराश्यातून आत्महत्येचे घटना घडत आहे. त्यामुळे यावर अंकुश बसणे गरजेचे आहे. अभिव्यक्ती विचारस्वातंत्र्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उध्दवस्त करणे, चारीत्र्य हनन करणे हे अपेक्षित नाही. याबाबत सायबर शाखेकडून कारवाई करण्यात यावी. डिजीटल माध्यमातून काेणतीही युटयुबचे टीआरपी वाढावे यासाठी दिशाभूल मजकूर प्रसारित केला जाताे त्यास कारवाई करुन आगामी काळात आळा बसेल. सायबर सुरक्षाबाबत राज्य महिला आयाेग विविध महाविद्यालय, शाळेत जाऊन जनजागृती करत आहे. आमच्याकडे येणाऱ्या तक्रारी लवकर निकाली काढण्यात येत आहे.