नववर्षांच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरला पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्याअनुषंगाने सर्वच पोलीस ठाण्यातंर्गत बंदोबस्त तैनात केला असून, शहरभरात ३ हजारांवर पोलीस अमलदारांसह अधिकारी दक्ष राहणार आहेत. त्यासोबत ८०० वाहतूक अमलदार, अधिकारी तैनात केले आहेत. प्रामुख्याने शहरभरातील २७ महत्वाच्या ठिकाणांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह पॉइंट केले आहेत. त्यानुसार बेशिस्त वाहन चालक, मद्यपी चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाईसह प्रसंगी वाहन जप्तीचीही कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.अमितेश कुमार म्हणाले, राज्य शासनाच्या आदेशानुसार पोलिसांकडून विविध नियमांची अमलंबजावणी केली जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर हॉटेल पब, बार मालकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अल्पवयीनींना मद्याची विक्री न करणे, वेळेचे बंधन पाळणे महत्वाचे आहे. तसेच पबमधील संगीताचा आवाज इतरांना त्रासदायक ठरणार नाही, याचीही संबंधितांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
पुणे-जयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलीस सज्ज झाले असून, अनुयायींच्या सुरक्षिततेसाठी तब्बल ५ हजार पोलीस अमलदार, एक हजार होमगार्ड, ४१४ पोलीस अधिकारी, १३२ पोलीस निरीक्षक, ४५ एसीपी, १६ उपायुक्त, ३ अपर आयुक्त असा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच आपत्कालीन घटना रोखण्यासह ३०० सीसीटीव्ही आणि दहा व दोन मोबाईल सर्विलन्स व्हॅन याद्वारे मॉनिटरींगच्या माध्यमातून बारीक गोष्टींवर लक्ष देण्यासाठी विशेष प्राधान्य दिल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, अपर आयुक्त अरविंद चावरिया उपस्थित होते.
पेरणे फाटा परिसरातील जयस्तंभ सोहळ्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी १ जानेवारीला दाखल होतात.त्यापार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी दक्षता घेतली आहे. जागोजागी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, विविध पथकांकडून सुरक्षिततेसाठी विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके तैनात केली आहेत. जागोजागी पोलीस मदत केंद्र, वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. त्यासोबतच सोहळ्यासाठी आलेल्या अनुयायींच्या वाहन पार्विंâगसाठी मोठ्या जागेची उपलब्धता करण्यात आली आहे.कोणत्याही प्रकारे गर्दी अडचण होणार नाही यादृष्टीने सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आले आहे. ४५ पार्किंग ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्यात ३० हजार कार आणि ३० हजार दुचाकी पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. वाहन तळापासून ६५० सार्वजनिक बसेसच्या माध्यमातून अनुयायींची जयस्तंभापर्यंत ने-आणची मोफत सोय करण्यात आली आहे.चोरी घटना रोखण्यासाठी विशेष पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.