केरळ मिनी पाकिस्तान आहे,राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे अतिरेकी आहेत -या नितेश राणे यांच्या वक्तव्यामुले देशभर संताप
पुणे- कॉंग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज नितेश राणे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला आहे . हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणे हाच भाजपचा अजेंडा असल्याचे यामुळे स्पष्ट झाले असून मंत्री होऊनही घेतलेल्या शपथेचे पावित्र्य भंग करणाऱ्या नितेश राणेंनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
केरळ सारख्या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणे, राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात! काही सकारात्मक करू शकत नसले की भाजप नेते हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान हाच अजेंडा राबवतात. पण मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक रित्या बोलताना, वागताना भान बाळगले पाहिजे पण नितेश राणे यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत!
जितकी जास्त बाष्कळ बडबड तितकी जास्त प्रगती हे समीकरण भाजपमध्ये असल्याने मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा तारे तोडले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी किमान आपल्या सहकाऱ्याला समजूत द्यावी, ही भाषा, हे वर्तन योग्य नाही, मंत्र्यांनी आपल्या पदाचे ग्रहण करताना शपथ घेतली आहे याची तरी आठवण ठेवावी आणि समाजात तेढ वाढणार नाही असे वर्तन करू नये!