पुणे-बाणेर येथील “अग्निशामक केंद्र” तातडीने सुरु करा अशी मागणी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आयुक्तांना लेखी निवेदन देऊन केली आहे.
मौजे बाणेर येथील स.नं.६६ येथे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉ.लि. यांच्या माध्यमातून अग्निशामक केंद्र उभारण्यात आलेले आहे. सदर अग्निशामक केंद्राचे काम सुमारे १ वर्षापूर्वी पूर्ण होऊन हे केंद्र पुणे महानगरपालिकेला हस्तांतरित देखील केले गेलेले आहे. २ अग्निशामक गाडी क्षमता असलेले हे अग्निशामक केंद्र अजूनही बंद अवस्थेत आहे.
बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे हा भाग अतिशय झपाट्याने वाढत असताना या भागातील गृहनिर्माण संस्था, लोकवस्ती तसेच लोकसंख्या देखील वेगाने वाढत आहे. लाखोंच्या संख्येने लोक या भागात राहत आहेत. या परिसरातील नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी हे अग्निशामक केंद्र तातडीने सुरु होणे गरजेचे आहे. या भागात उंच इमारती (हाय राईज बिल्डींग) असून या भागाकरिता अत्याधुनिक अशा उंच शिडीच्या २ अग्निशामक गाड्या (फायर वेहिकल) आणि तसेच अधिकारी व कर्मचारी यांची आवश्यकता आहे. तरी या गोष्टी तातडीने उपलब्ध करून हे अग्निशामक केंद्र सुरु करावे.
या बाबतचे निवेदन नगरसेवक श्री.अमोल बालवडकर यांनी आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून दिले. यावर तातडीने तरतूद उपलब्ध करून देऊन हे “अग्निशामक केंद्र” लवकरच सुरु करण्यात येईल असे आयुक्तांनी आश्वस्त केले.