मुंबई-जेव्हा आमचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा पाकिस्तानी पंतप्रधानांकडून अपमान झाला होता. पण तेव्हा त्यांच्या समर्थनासाठी काँग्रेस कधीच पुढे आली नाही,असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचे राजकारण केल्याचा आरोप करत पक्षाने मनमोहन सिंग यांचा अपमान केल्याचा दावा केला आहे. कारण ते गांधी घराण्यातून नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले की, भारताचे महान अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपुर्ण देश शोक व्यक्त करत आहे. आपण सर्वजण दु:खात आहोत, मलाही दुख: वाटत आहे. त्यांच्या निधनानंतरही काँग्रेस घाणेरडे राजकारण करत आहे, हे दु:खद आहे.
भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी (26 डिसेंबर) रोजी जगाचा निरोप घेतला. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून 10 वर्ष देशाची धुरा सांभाळली. भारताला अर्थिक संकटातून बाहेर काढण्यात मोठे योगदान देणारे ते अर्थतज्ज्ञ होते. मनमोहन सिंग हे एक चांगले राजकारणी होते परंतू त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या नावाचे राजकारण संपलेले नाही.
मनमोहन सिंग गांधी घराण्यातून आलेले नसल्यामुळे काँग्रेसने त्यांचा अपमान केला असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आम्ही याआधीही अशा अनेक बड्या नेत्यांचा अपमान होताना पाहिला आहे, केवळ ते गांधी घराण्यातून नव्हते म्हणून त्यांचा अपमान होतो. आम्ही असे प्रसंग पाहिले आहे जेव्हा आमचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा पाकिस्तानी पंतप्रधानांकडून अपमान झाला होता. पण त्यांच्या समर्थनासाठी काँग्रेस कधीच पुढे आली नाही.
राहुल गांधींवर आरोप करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांच्या (मनमोहन सिंग) अपात्रतेचा अध्यादेशही राहुल गांधींनीच फाडला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांचा अपमान केला असे अनेक प्रसंग आल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. केवळ मनमोहन सिंगच नाही तर दिवंगत पीव्ही नरसिंह राव, दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही त्यांच्याच पक्षाच्या आणि घराण्यातील नेत्यांकडून अपमान सहन करावा लागला असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. फडणवीसांनी पुढे लिहिले की, पीव्ही नरसिंह राव यांच्या पार्थिवालाही एआयसीसी मुख्यालयात प्रवेश दिला गेला नाही. या सर्व घटनांमुळे लोकशाही आणि संविधानाचे सार जपण्यासाठी घराणेशाहीचे राजकारण किती धोकादायक आहे, याची आठवण करुन देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.