पुणे : गंगाधाम रोडवरील एका हॉटेलमध्ये बिनधास्तपणे सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा घालून तिघांना अटक केली आहे.भरत देवाप्पा गावडे (वय ३३, रा. शिवराय कॉलनी, अप्पर इंदिरानगर), दिपेंद्र मानबहादुुर खडका (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर) आणि सिद्धार्थसिंग अशोक कुमार सिंह (वय २२, रा. शिवराय कॉलनी, अप्पर इंदिरानगर) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई मार्केटयार्डमधील गंगाधाम रोडवरील आई माता मंदिराजवळील हॉटेल बिलयन्स लाऊन्ज येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली.
याबाबत पोलीस हवालदार पृथ्वीराज पांडुळे यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल बिलियन्स लाऊन्ज येथे हुक्का पिण्यास दिले जात असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनिट ५ ला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याची खात्री केल्यानंतर सायंकाळी हॉटेलवर छापा घालण्यात आला. त्यावेळी हॉटेलमध्ये हुक्का पॉट, तंबाखुजन्य अफजल, अलफकर, अलकियान हे हुक्का फ्लेवर ग्राहकांना धुम्रपानासठी अवैधरित्या विना परवाना विक्रीसाठी ठेवण्यात आलेले मिळून आले. सहायक पोलीस निरीक्षक सिसाळ तपास करीत आहेत.