मुंबई- प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली आहे. यावेळी प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे समजते.बीड येथे माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला होता. इव्हेंट पॉलिटिक्स शिकायचे असेल तर बीडमधून शिका या संदर्भात बोलताना आमदार सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींचा उल्लेख केला त्यात प्राजक्ता माळीचा देखील होता. यावरून प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत जाहीर माफी मागण्याचे आव्हान धस यांना केले आहे.
प्राजक्ता माळी यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल. त्यांच्या विरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करत आहेत, अशी तक्रार त्यांनी केली आहे. त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवावा. कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.