मुंडेंचे मंत्रिपद वाचवण्यासाठी कराड शरण येणार
मुंबई-मस्साजोगच्या आवादा कंपनीस दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आरोपी असलेला वाल्मीक कराड याच्यासह संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे अशा एकूण चार आरोपींची बँक खाती सीआयडीकडून गोठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचबरोबर आरोपींच्या पासपोर्टबाबतही कारवाई सुरू आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ३ आरोपी २० दिवसांपासून फरार आहेत. त्याचबरोबर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड अशा एकूण चार फरार आरोपींच्या तपासासाठी सीआयडीच्या ९ पथकांकडून देशभरात तपास केला जात आहे. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक जणांची चौकशी केली आहे. आरोपींना मंत्री धनंजय मुंडे यांचे अभय असल्याचा आरोप करत विरोधकांनी शनिवारी बीडमध्ये भव्य मोर्चा काढला होता. त्यानंतर कारवाईला गती आली आहे.
वाल्मीक कराड याच्या अटकेसाठी सरकारवर मोठ्या प्रमाणावर दबाव वाढला आहे. धनंजय मुंडे यांचे मंत्रिपदही धोक्यात आले आहे. कराडला अटक झाल्याशिवाय या प्रकरणावर पडदा पडणार नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी त्याला बीडबाहेर शरण येण्यास भाग पाडले जाऊ शकते, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली.
११ डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आरोपी वाल्मीक कराड २० दिवसांपासून पोलिसांना सापडलेला नाही. गुन्हा नोंद झाला त्या दिवशी कराड हा मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होता. विशेष म्हणजे या वेळी त्याच्यासोबत अंगरक्षक पोलिस कर्मचारीही होता. १३ डिसेंबरपर्यंत तो मध्य प्रदेशातच असल्याचे मोबाइल लोकेशनवरून स्पष्ट झाले, पण नंतर मोबाइल बंद झाल्याने त्याचा शोध लागलेला नाही. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातही वाल्मीक कराडवर संशय आहे. तो मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, सध्या सीआयडीकडून कराडच्या पत्नीची रविवारी दुसऱ्यांदा चौकशी केली.