मातोश्री मीराबाई पटोले यांचे वृद्धापकाळाने निधन.
साकोली, दि. २९ डिसेंबर २०२४.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाना पटोले यांना मातृशोक झाला आहे. नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी स.६ वाजता सुकळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या.
नाना पटोले यांच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या मीराबाई खूपच सोज्वळ स्वभावाच्या होत्या, त्यांच्या मनमिळावू स्वभावाने त्या कार्यकर्त्यांसाठी मातेसमान होत्या. नाना पटोले यांच्याकडे कोणत्याही कामाने येणार्या व्यक्तींची स्नेहाने व आपुलकीने विचारपूस करून त्यांचा आदर सत्कार करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या निधनाने नाना पटोले यांच्याबरोबरच संपूर्ण कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मीराबाई पटोले यांच्या मृत्यूपश्चात दोन मुले, सूना, तीन मुली, जावई, नातवंडे असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज रविवारी दुपारी २ वाजता साकोली तालुक्यातील मौजा सुकळी महालगांव या नाना पटोले यांच्या गृहगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह हजारो लोक उपस्थित होते.