पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीत ‘यात्रा’ची बाजी
‘कलम 375’ ठरली सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिका
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत कोल्हापूरच्या देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सने सादर केलेल्या ‘यात्रा’ एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावित पुरुषोत्तम करंडकावर नाव कोरले. संघास पाच हजार एक रुपयांचे रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात आले. तर सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेला कुमार जोशी करंडक शहाजी विधी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘कलम 375’ या एकांकिकेने पटकाविला. या संघास रोख रुपये चार हजार एक, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांच्या नावांची घोषणा होताच स्पर्धकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘ज्योतीबाच्या नावाने चांगभलं’, ‘उद गं आई उद’ अशा आरोळ्या देत एकच जल्लोष केला. सांघिक प्रथम आणि प्रायोगिक एकांकिकेसाठी पारितोषिक पटकाविणाऱ्या कोल्हापूरातील संघांचा आवाज दणाणला.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी दि. 27 ते दि. 29 डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत एकूण 18 संघांनी सादरीकरण केले. स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ आज (दि. 29) सायंकाळी भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुप्रसिद्ध अभिनेते, पद्मश्री मनोज जोशी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, परीक्षक सुषमा देशपांडे, अनिल दांडेकर, वैभव देशमुख मंचावर होते. स्पर्धेचा निकाल ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी जाहीर केला. सांघिक द्वितीय आलेल्या ‘पाटी’ या एकांकिकेस श्रीराम करंडक तर सांघिक तृतीय आलेल्या ‘देखावा’ या एकांकिकेस पंडित विद्याधर शास्त्री भिडे करंडक मिळाला.
परकाया प्रवेशासाठी भाषेवर प्रभुत्व हवे : मनोज जोशी
भारतीय रंगभूमीवरील पुरुषोत्तम योग म्हणजे पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख करून मनोज जोशी स्पर्धकांशी संवाद साधताना म्हणाले, नाटक हे प्रत्येक कलेचे मिश्रण आहे. एकांकिका स्पर्धांना सिरिअलमध्ये जाण्याची पायरी मानू नका. अभिनयाच्या ताकदीतून रसोत्पत्ती निर्माण करण्यासाठी नाटक पाहणे, तालीअम करणे आणि सतत वाचत राहणे गरजेचे आहे. हे त्रिगुण साधल्यास संगीत, नेपथ्य बाजूला पडून अभिनयाच्याद्वारे कलाकार रंगभूमीवर यश प्राप्त करू शकतो. माझ्यासाठी नाटक हे नुसते गंगास्नान नव्हे तर प्राणवायू आहे. भारतात कुठेही अशा स्वरूपाची स्पर्धा आयोजित केली जात नसावी. त्यामुळे मुंबईत वाढलेल्या मला पुरुषोत्तम स्पर्धेत भाग घेता आला नाही याचे कायम दु:ख वाटत राहिल. आज-काल आपण समृद्ध भाषा विसरत चाललो आहोत. शब्द भांडार कमी होत आहे. अशा परिस्थितीत भाषा आणि संस्कृतीचे देणे-घेणे वाढविण्यासाठी मिळेल त्या साहित्यकृती वाचत राहा. भाषेचा प्रकार अवगत नसेल, त्याचे ज्ञान नसेल तर वाचिक अभिनय करणे शक्य नाही. तसेच भूमिकेत शिरण्यासाठी परकायाप्रवेश करताना भाषेवर प्रभुत्व असणे अत्यंत आवश्यक आहे. नाटकात काम करताना इमानदारीत काम करा, नटेश्वराला संपूर्ण समर्पित झाला तर तो नक्कीच प्रसन्न होतो. नाटकाचे संस्कार असल्यास पुढील आयुष्यात सांघिक शक्ती, समर्पण भाव, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढीस लागते आणि तुम्ही उत्तम माणूस बनता.
उत्तम संवादफेक आवश्यक : सुषमा देशपांडे
परिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे म्हणाल्या, एकांकिकेची निवड करताना मुलांनी भरपूर वाचन केले पाहिजे. अनेक नाटके वारंवार बघितली पाहिजेत. यातून विषयाची निवड करणे सुकर होते. एकांकिका व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून वापरा. नाटकातील प्रोजेक्शनचा अर्थ समजून घ्या. तंत्रावर अवलंबून न राहता शब्द, भावना पोहोचण्यासाठी उत्तम संवादफेक असणे आवश्यक आहे. नाटकाचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासाठी नक्कीच होतो.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
सांघिक प्रथम : यात्रा (देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
सांघिक द्वितीय : पाटी (विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती)
सांघिक तृतीय : देखावा (न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर)
सर्वोकृष्ट प्रायोगिक करंडक : कलम 375 (शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर)
वैयक्तिक पारितोषिके
सर्वोकृष्ट अभिनय : पुरुषोत्तम नारायण गाडकीळ करंडक : श्रद्धा रंगारी (सुवर्णा, पाटी, विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती)
अभिनय नैपुण्य : दिशा फाऊंडेशन करंडक : पुरुष : सुजल बर्गे, (अरविंद, पाटी, विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती)
अभिनय नैपुण्य : अरुणा जोशी करंडक : स्त्री : अक्षता बारटक्के (म्हातारी, यात्रा, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
सर्वोकृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य : विश्वास करंडक : पार्थ पाटणे (घन:श्याम, यात्रा, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
सर्वोकृष्ट दिग्दर्शक : चैतन्य प्रणित करंडक : अभिषेक हिरेमठ स्वामी (यात्रा, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
अभिनय उत्तेजनार्थ पारितोषिके : नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय या क्रमाने
पवन पोटे (शंकर, देखावा, न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर)
यश पत्की (सदा मोरे, बस क्र. 1532, म. ए. सो.चे गरवारे वाणिज्य महाविद्यालय, पुणे)
ओम चव्हाण (सुदामा, सखा, आय. एम. सी. सी. पुणे)
श्रेया माने (सई, व्हाय नॉट, राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालय, साखराळे, इस्लामपूर)
अथर्व धर्माधिकारी (राजाराम-बाप, देखावा, न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर)
मानसी बोळूरे (व्यक्ती 2, कलम 377, शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर)
शांभवी सुतार (म्हातारी, होळयोनागरा, फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी)
समर्थ तपकिरे (दिल्या, पिंडग्रान, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोल्हापूर)
सुमित डोंगरदिवे (मास्तर, फाटा, देवगिरी महाविद्यालय, नाट्य शास्त्र विभाग, संभाजीनगर)
तृती येवले (म्हातारी/लक्ष्मी, सखा, आय. एम. सी. सी. पुणे)