पुणे-गझल आणि कविता म्हणजे जीवनाची मीमांसा असते, जीवनासंबंधीची प्रतिक्रिया असते, जीवनावर केलेले भाष्य असते. गझल लेखनातून जीवनानुभूतीचे प्रतिबिंब दिसावे. गझल म्हणजे केवळ सुख – दुःख नसते तर त्यातून जीवनच वाहत असते, असे मत व्यक्त करुन संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांनी मराठी गझल सादरीकरणातून वेगवेगळे पैलू सादर केले. डॉ. अविनाश सांगोलकर व अशोक भांबुरे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. आपल्या गझलांद्वारे त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. गझलकार श्रीकांत वाघ, सुधीर कुबेर, साजन पिलाने, मीना शिंदे, प्राजक्ता पटवर्धन, विजया देव यांनी देखील गझल सादरीकरणाद्वारे रसिकांची मने जिंकली.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात येणाऱ्या ९८ कार्यक्रमांच्या अंतर्गत सरहद महाविद्यालयाच्या मराठी विभाग आणि मराठी वाड्मय मंडळातर्फे ‘मराठी गझल संमेलन- गझलगुंजन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कला शाखा व मराठी विभाग प्रमुख डॉ.वंदना चव्हाण यांनी अमृत राय, मोरोपंत, माधव जुलियन, सुरेश भट, रमण रणदिवे, डॉ. अविनाश सांगोलकर,अशोक भांबुरे यांनी लिहिलेले शेर सादर करुन गझल या काव्य प्रकाराचे स्वरूप, वाटचाल व महत्त्व सांगितले तसेच विद्यार्थ्यांना मराठी गझल या काव्य प्रकारामध्ये अभिरुची निर्माण व्हावी, या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, हे प्रास्ताविकामधून मांडले. कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये स्वरगंधार संस्थेचे संस्थापक गोपाळ कांबळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी सरहद संस्थेच्या सचिव सुषमा नहार, कांतीलाल नहार, अभय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, प्रशांत तळणीकर, माजी प्राचार्य डॉ. हनुमंतराव जाधवर, प्राचार्य डॉ. संगीता शिंदे, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. श्रीराज भोर व प्रा. संगीता घुगे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. स्वप्ना थोरगुले यांनी केले.
सरहद महाविद्यालयात मराठी गझल संमेलन – गझलगुंजनला उत्स्फूर्त प्रतिसाद
Date:

