पुणे, दि.२८: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्यावतीने (सारथी) ‘सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ अंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील १ हजार ५०० तरुणांना वाहन चालक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षित वाहन चालकांची देशात व देशाबाहेर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यानुसार संस्थेने १५०० व्यक्तींना दर वर्षी हलकी मोटार वाहने (लाईट मोटर व्हेईकल) व जड मालवाहू वाहने (हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल) चालविण्याचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या तरुण-तरुणींना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत असलेल्या आय.डी.टी.आर. पुणे या केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत एका महिन्याचे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येईल.
दररोज आठ तासाचे हे प्रशिक्षण राहील. त्यामध्ये वाहनांचे भाग, त्यांची देखभाल, दुरुस्ती तसेच वाहनचालनाच्या भारतातील व परदेशातील नियमांची माहिती देण्यात येईल. तसेच दररोज क्षेत्रीय स्तरावर सराव व प्रशिक्षण देण्यात येईल. या विद्यार्थ्यांना एका प्रशिक्षण महिन्यासाठी रुपये १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल.
सारथीचे अध्यक्ष तथा निवृत्त मुख्य सचिव अजित निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालक मंडळाने १७ डिसेंबर २०२४ रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या योजनेला मान्यता दिली असून हे प्रशिक्षण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहे.
यामुळे राज्यातील ग्रामीण भागात तसेच परदेशात तरुणांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. याकरिता जास्तीत जास्त सारथी लक्षीत गटातील व्यक्तींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.