चार दिवस विविध साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम; महाराष्ट्रासह देशविदेशातून ६०० कवींचा सहभाग२५ फुलेप्रेमी कवींना ‘समाजरत्न पुरस्कार’ पुरस्कार; कवी विजय वडवेराव यांची पत्रकार परिषदेत माहिती
पुणे: देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत पहिल्या आंतरराष्ट्रीय म.फुले फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात सकाळी ९ ते रात्री ९ असा सलग १२ तास, चार दिवस हा फेस्टिव्हल होणार आहे. महाराष्ट्रासह देशविदेशातून ६०० कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती फेस्टिवलचे मुख्य आयोजक, भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. सहकारी अरविंद बनसोडे यावेळी उपस्थित होते.
विजय वडवेराव म्हणाले, “क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरु केली. या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुलेंच्या या कार्यकर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा, हा या फेस्टिवलच्या मुख्य उद्देश आहे. या फेस्टिवलमध्ये देश-विदेशातील सहाशे कवींचा काव्य महोत्सव, भिडेवाडा या विषयावर मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगितिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध उपक्रम या चार दिवसात होणार आहेत.”
“फेस्टिवलमध्ये सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे. दुबईतील कवींच्या हस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन होईल. लंडन, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी आदी देशांतून, तसेच केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तरप्रदेश आदी राज्यातून कवी-कवयित्री सहभागी होत आहेत. सावित्रीमाई, फातिमाबी व महात्मा फुले यांच्या वेशात कवी सहभागी होणार आहेत, हे या फेस्टिव्हलचे आकर्षण असणार आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा त्याग, समर्पण आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान अमूल्य आहे. फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्याबाबतचा जागरही या फेस्टिवलमध्ये केला जाणार आहे. ही एक चळवळ असून, फुले विचार पुढच्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहे,” असे वडवेराव म्हणाले.
भिडेवाडा अभियानात विशेष कार्य करणाऱ्या जगभरातील २५ फुलेप्रेमी कवी, कवयित्री व कार्यकर्त्यांना फेस्टिव्हलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये क्रांती वेंदे (धुळे), पूनम पाटील (जळगाव), नंदा मघाडे (जळगाव), सुधीर महाजन (जळगाव), मुकुंद जाधव (जळगाव), कांचन मून (पुणे), प्रतिभा कीर्तीकर्वे (पुणे), सरिता कलढोणे (पुणे), वनिता जाधव (बारामती), सुनिता नाईक (खेड), बा. ह. मगदूम (सांगली), एम. डी. कदम (सांगली), आनंद चोपडे (बेळगाव कर्नाटक), मनोज भार शंकर (अबुधाबी), अरविंद बनसोडे (पुणे), विशाल बोरे (अकोला), प्रा. माया मुळे (धाराशिव), डॉ. दिलीप नेवसे (सातारा), सुमनताई मनवर (यवतमाळ), संगिता कानिंदे (यवतमाळ), वर्षा शिंदे (पुणे), उमेश शिरगुप्पे (गोवा) यांचा समावेश आहे, असे वडवेराव यांनी नमूद केले.