डॉ. श्रीपाल सबनीस हे झुंजार वृत्तीचे खरे विचारवीर : डॉ. शां. ब. मुजुमदार
‘सत्यान्वेषी तत्त्वज्ञ : विश्वात्मक पुण्याईची बेरीज करणारे डॉ. श्रीपाल सबनीस’ गौरवग्रंथाचे प्रकाशन
पुणे : मी चौकट मोडून उभा राहणारा व्यक्ती आहे. मला गांधी, आंबेडकर, सावरकर अशा प्रत्येकात चांगुलपण दिसते. गांधींमधील महात्मा आणि अहिंसातत्त्व तर डॉ. आंबेडकर यांच्यातील समता हे तत्त्व मान्य होण्यासारखे आहे. परंतु सावरकर हिंदुत्वाचा प्रचार करत, हिंदुत्वासाठी स्वातंत्र्य मागत हे अमान्य असले तरी त्यांच्यातील विज्ञानवाद कसा नाकारणार असा थेट प्रश्न अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केला. डॉ. सबनीस यांची भूमिका समन्वय आणि विवेकाची आहे. त्यांच्या विचारांना जेवढा जास्त विरोध होतो तेवढे जास्त चैतन्य त्यांच्यात निर्माण होते. असे झुंजार वृत्तीचे सबनीस हे खरे विचारवीर आहेत, असे गौरवोद्गार सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी काढले.
प्रसिद्ध विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यावरील ‘सत्यान्वेषी तत्त्वज्ञ : विश्वात्मक पुण्याईची बेरीज करणारे डॉ. श्रीपाल सबनीस’ या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र साहित्य परिदषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मानवतेची भूमिका मांडताना सबनीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शां. ब. मुजुमदार होते. साहित्य संमेनलाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. केशव देशमुख, डॉ. माधवी खरात, गौरव प्रंथाचे ललिता सबनीस, संपादक संदीप तापकीर, प्रकाशक अमृता खेतमर, संयोजक मारुती डोंगरे मंचावर होते. डॉ. सबनीस यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे.
सद्यस्थितीत संस्कृतीचे दिवाळे निघाले आहे; राजकारणाचे वाटोळे झाले आहे; परंपरा बुडाली आहे; संस्कृतीत घोटाळे झाले आहेत. वर्तमानाच्या विरुद्ध भूमिका घ्यायची असेल तर ती मला ठामपणे मांडावीच लागेल, असे डॉ. सबनीस या वेळी म्हणाले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, जगात सर्वात प्रबल आणि शक्तीमान आहे तो म्हणजे विचार. जो धार्मिक, सामाजिक, राजकीय सुद्धा असू शकतो. प्रत्येक धर्माचा संस्थापक एक विचार घेऊन पुढे आलेला प्रेषित असतो. त्यावर पुटे चढली तरी मूळ धर्माकडे दुर्लक्ष करता कामा नये, कारण प्रत्येक धर्मात काही तरी चांगले विचार असतातच.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, सबनीस यांची प्रश्न मांडण्याची हातोटी वेगळ्या प्रकारची आहे. ते वैचारिक लेखक आहेत. स्पष्टपणा हे त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या लेखनातून प्रश्न निर्माण होतात हे त्यांच्या लेखनाचे यश समजावे. सबनीस यांच्या समन्वय आणि विवेकाच्या संकल्पना महत्त्वाच्या असल्या तरी त्याची वास्तवता जाणून घेणे आवश्यक आहे.
डॉ. सबनीस हे वीरपुरुषोत्तम असल्याचे डॉ. केशव देशमुख यांनी सांगितले. सबनीस यांचे लेखन समाजाला विशिष्ट दिशा देणारे असल्याचे डॉ. माधवी खरात म्हणाल्या. डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, सबनीस यांच्याविषयी सर्व घटकातील मान्यवरांनी केलेल्या लिखाणामुळे त्यांचे सर्वसमावेशकतेचे धोरण दिसून येते. लेखक प्रतिनिधी डॉ. उर्मिला चाकूरकर, ॲड. मोहन शुक्ल यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. सबनीस हे रोखठोक भूमिका घेणारे, आपली अभ्यासपूर्ण मते स्पष्टपणे आक्रमक शैलीत मांडणारे लेखक असून त्यांच्या लिखाणातून वैचारिक प्रगल्भता दिसून येते असे मत गौरवग्रंथांचे संपादक संदीप तापकीर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लता पाडेकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत मारुती डोंगरे, अमृता खेतमर, डॉ. प्रदीप खेतमर, संदीप तापकीर यांनी केले.