बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तर या घटनेचा निषेध करण्यासाठी बीडमध्ये आज सर्वपक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला आहे. याप्रसंगी बोलताना बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी सर्वपक्षीय व्यासपीठावरुन मुंडे बहीण भावावर ताशेरे ओढले आहेत. तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्य़वस्थेवरुन सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. ‘बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. २०१९ पासून सलग पाच वर्षे पाहतोय कुठे कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. एक सोज्वळ आणि एक तरुण सरपंच संतोष अण्णाला घालवायचं पाप आज या परळीवाल्यांनी केलंय हे उघड आहे.’ असे सोनावणे म्हणाले.
बजरंग सोनावणे म्हणाले, संतोषचं अपहरण झाल्यापासून न्यायासाठी आपण झटतोय. पण अजूनही सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. फक्त आश्वासन मिळत आलं आहे. ज्यादिवशी मी अमित शाह यांची भेट घेतली तेव्हा कुठे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आकाचा मास्टरमाइंड कोण आहे? हे समोर आलं पाहिजे.’ पुढे धनंजय मुंडेंवर निशाणा साधत सोनावणे म्हणाले, ‘मुंडेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला बीडला न्याय द्यायाच असेल आणि या मातीत तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही बीडच्या जनतेला सांगा फेकतो राजीनामा… तुम्हाला मंत्रिपद कशाला पाहिजे. फक्त आमचे पाडायला?’ असा खडा सवाल बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला आहे.सोनावणे पुढे म्हणाले, ‘ते (धनंजय मुंडे) काय म्हणतात जाती धर्माचा विषय ताणला जातो. कोणीतरी मला या प्रकरणात म्हटलं जात आणू नका जातीचा माणूस नाही भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार साहेबांचे सुद्धा एक आमदार आहे. आमचे पाटीलसाहेब सुद्धा येतात आणि आमच्या पक्षाचे सुद्धा दोन आमदार आणि खासदार येथे आहेत. आमचे पराजित झालेले दोन्ही उमेदवार असे सर्वपक्षीय आहेत. सर्व जाती धर्माचे आमदार आहेत. ओबीसी आहे जातींचा आधार तुम्हाला लागतोय म्हणून तुम्ही जाती धर्माचे नाव काढता. तुम्हाला जातीच्याशिवाय राजकारण करता येत नाही. तुम्हाला पक्षीय राजकारण करायचं आहे, आम्हाला नाही. आम्हाला संतोष अण्णाला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायचंय, असा हुंकार सुद्धा सोनावणेंनी भरला आहे.तर ‘प्रशासनाला दोन गोष्टी आजच्या या मोर्चातून सांगायच्या आहेत की, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी द्या, त्यांना न्याय द्या. वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा. ३०२ मध्ये कराडला आरोपी म्हणून सामावेश करा. २ तारखेपर्यंत यावर कारवाई झाली नाही तर उपोषणाला मी बसणार आहे. अशी मागणी देखील बजरंग सोनावणेंनी केली आहे.