उर्मिला थोडक्यात वाचली, कार चालकावर गुन्हा
मुंबई-अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने मुंबईत 2 मजुरांना उडवले असून, त्यातील एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत स्वतः उर्मिला व तिचा ड्रायव्हरही जखमी झाल्याची माहिती आहे. शूटिंगवरून घरी परत येताना मुंबईतीत ही घटना घडली आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. पण ती आज समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार, उर्मिला कोठारे शुक्रवारी रात्री उशिरा आपली शूटिंग आटोपून घरी परत जात होती. त्यावेळी तिच्या कारने रस्त्याच्या कडेलो मेट्रोचे काम करणाऱ्या 2 मजुरांना धडक दिली. या धडकेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. कारचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडला.
या अपघातात उर्मिला कोठारे व तिचा ड्रायव्हरही जखमी झाला आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. गाडीची एअरबॅग योग्य वेळी उघडल्यामुळे उर्मिलाचा जीव वाचला. पण तिच्या कारचा या घटनेत पूर्णतः चेंदामेंदा झाला. दुसरीकडे, एका मजुराचा बळी गेल्यामुळे या घटनेचे गांभिर्य वाढले आहे. समतानगर पोलिसांनी या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.