पुणे : शाकीर खान यांचे पहिल्या झंकारापासूनच मंत्रमुग्ध करणारे सतार वादन आणि भुवनेश कोमकली यांचे भारदस्त, सुरेल गायन ऐकून पुणेकर रसिकांची सायंकाळ स्वरमय झाली. निमित्त होते ते कै. अरविंद देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित स्वरगंध या सांगीतिक मैफलीचे.
भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासणऱ्या कै. अरविंद देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी त्यांचे चिरंजीव मंदार देशपांडे व केदार देशपांडे यांनी या मैफलीचे आयोजन केले होते. मैफल एमईएसचे बालशिक्षण मंदिर सभागृहात झाली.
मैफलीची सुरुवात शाकीर खान यांच्या सुमधुर सतार वादनाने झाली. त्यांनी चारुकेशी रागातील बारकावे आपल्या नजाकतदार वादनाने उलगडून दाखविताना सतार या वाद्यावरील आपली पकड, अतिशय वेगाने चालणारी बोटे त्यातून निर्माण होणारे सतारीचे झंकार अशा प्रभावी सादरीकरणाने रसिकांना विस्मयचकीत केले. शाकिर खान यांच्या जादुई बोटातून उमटलेल्या या रागाने संपूणे वातावरण भारित झाले होते. त्यानंतर शाकिर खान यांनी राग पिलू अमधील रचना सादर केली. खान यांना अमित कवठेकर यांनी परिपूर्ण व समर्पक तबला साथ केली. उमंग ताडफळे यांनी तानपुरा साथ केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली यांनी गायनाची सुरुवात राग शुद्ध कल्याणमधील बडाख्यालातील ‘ बोलन लागी’ या पारंपरिक बंदिशीने केली. याला जोडून छोटाख्याल सादर करताना आपले आजोबा व ख्यातनाम गायक पं. कुमार गंधर्व यांची ‘ये मोरा रे मोरा’ ही बंदिश ऐकविली. सुरांवरील पकड, तंत्रशुद्ध-स्पष्ट गायन, दमदार ताना हे गायन प्रभुत्व ऐकून रसिकांनी कोमकली यांना खुली दाद दिली. ‘दिल दा मालक साई’ ही पारंपरिक बंदिश तसेच ‘रूप धरे’ ही कुमार गंधर्व रचित बंदिश सादर करताना कोमकली यांनी आजोबांच्या गायन वैशिष्ट्याची छाप रसिकांच्या मनावर सोडली. रसिक श्रोते व साथसंगतकारांच्या आग्रहपूर्वक विनंतीला मान देऊन भुवनेश कोमकली यांनी राग सोहनी मधील ‘ये द्रुम द्रुम लता’ ही सुंदर रचना मोठ्या आवडीने ऐकविली. रसिक श्रोते कोमकली यांच्या गायनाने इतके प्रभावित झाले की कोणीही मैफल सोडून जायला तयार नव्हते. रसिकांच्या या असीम प्रेमामुळे कोमकली देखील भावविभोर झाले. कोमकली यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), संजय देशपांडे (तबला) यांनी दमदार साथ केली.
कलाकारांचा सत्कार कै. अरविंद देशपांडे यांच्या पत्नी अनुराधा देशपांडे व पुतण्या हेमंत देशपांडे यांनी केला. प्रास्ताविकात मंदार देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद करून मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन व कलाकार परिचय आरती पटवर्धन यांनी करून दिला.