दयानंद घोटकर लिखित ‘आनंद पेरीत जाताना’ ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन
पुणे : अध्यापनातील तोच-तोपणा टाळत वैविध्यता आणून ते अधिक प्रभावी कसे करता येईल याचा वस्तुपाठ ‘आनंद पेरीत जाताना’ या ललित लेखसंग्रहातून शिक्षकांना नक्कीच मिळेल. आपले चुकते कुठे, नेमके काय करावे आणि करू नये हे सुद्धा यातून कळेल, असे प्रतिपादन प्रा. रवींद्र कोठावदे यांनी केले.
दयानंद घोटकर लिखित ‘आनंद पेरीत जाताना’ या ललित लेखसंग्रहाचा प्रकाशन सोहळा अभिनव विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रा. कोठावदे बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापीका वंदना अणेकर यांच्या हस्ते झाले. पर्यवेक्षिका नयना सावंत मंचावर होत्या.
प्रा. कोठावदे पुढे म्हणाले, वास्तव स्वीकारून आपल्या पाल्याची जडणघडण कशी करावी याचे मार्गदर्शनही या ललित लेखसंग्रहातून होण्यास मदत होणार आहे. ललित लेखनाचा आधार घेऊन प्रहसनाद्वारे विषयांची मांडणीही चांगल्याप्रकारे होऊ शकेल.
मुख्याध्यापिका वंदना अणेकर म्हणाल्या, शाळेचे माजी शिक्षक असलेल्या घोटकर यांनी पुस्तक प्रकाशनाचा मान शाळेला दिला ही आनंदाची बाब आहे. या पुस्तकाचे वाचन विद्यार्थ्यांसह पालकांनीही करावे, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
दयानंद घोटकर म्हणाले, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात वावरत असताना खूप काही शिकायला मिळाले. त्यातील काही अनुभवांमधून निवडक प्रसंग छोट्या-छोट्या ललित लेखांमधून मांडले आहेत. यातीलकाही लेख हलके-फुलके तर काही वैचारिक स्वरूपाचे आहेत. यात मातृभाषा, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजाचा सन्मान तसेच प्रार्थना, छंद, शिक्षा याविषयांवरही लेखन केले आहे. शिक्षकांसह पालकांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवती जोशी यांनी केले. दिलीपराज प्रकाशनने पुस्तक निर्मिती केल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार.