पुणे, दि. २७: पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे ३० डिसेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश प्र. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत.
वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ३० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सोमवती अमावस्या यात्रेकरीता येणारी हलकी व इतर वाहने वगळून जड-अवजड वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक बदल: सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने नीरा- मोरगाव- सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणेकडे वळविण्यात येत आहे. पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतूक बेलसर- कोथळे- नाझरे- सुपे- मोरगाव रोड मार्गे बारामती किंवा फलटण या मार्गे वळविण्यात येत आहे.
सुपा पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक बदल: बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी वाहनांची वाहतूक बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणेकडे वळविण्यात येत आहे.
सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक बदल: पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजुकडे जाणारी वाहनांची वाहतूक पुर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे-वीर-वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.
वाहतुकीस लावलेले निर्बंध ३० डिसेंबर रोजीच्या ‘श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रे’करीता येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
0000