बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या मुद्यावरून आता महायुतीमधील घटकपक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यासंबंधी मंत्री धनंजय मुंडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली. त्यानंतर धस यांनी त्यांना ‘आपल्या नादी लागल्यास लै महागात पडेल’ असा धमकीवजा इशारा दिला. आता मिटकरी यांनी त्यांच्या या धमकीला गांभिर्याने घेत पोलिसांना या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.
अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे संतापलेल्या धस यांनी त्यांना आपल्या नादी न लागल्याचा इशारा दिला आहे. ‘अमोल मिटकरी फार लहान आहे. माझी त्याला एकदा विनंती आहे की, अमोल तू कोणाच्याही नादी लाग, पण या रगेलाच्या नादी लागू नको. तुला लै महागात पडेन. मी एकदा आता त्याचे ऐकून घेतो. वडीलकीच्या नात्याने त्याला एकदा समज देतो. तुझे कुणीकडेही दुकान चालव, पण माझ्याकडे दुकान चालवू नको’, असा इशारा सुरेश धस यांनी दिला आहे.
सुरेश धस यांच्या या इशाऱ्यानंतर अमोल मिटकरी यांनी पुन्हा त्यांच्यावर पलटवार केला. ‘आमदार सुरेश धस यांच्या धमकीला पोलिसांनी गांभीर्याने घ्यावे. महागात पडेल म्हणजे काय? यावरून यांची एकंदरीत कारकीर्द लक्षात येते. गृह विभाग व पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन धस यांच्यावर योग्य ती कारवाई करावी,’ अशी मागणी मिटकरी यांनी एका ट्विटद्वारे केली. मिटकरी यांच्या प्रत्युत्तरामुळे या दोन्ही आमदारांतील कलगीतुरा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
अमोल मिटकरी म्हणाले होते की, केवळ पंकजाताई व धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकत्र आल्याने महायुतीचे व विरोधातील आमदार एकत्र येऊन आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला संपवण्याचे पद्धतशीर काम करत आहेत. त्यासाठी एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या आहेत.संजय राऊत व सुरेश धस यांनी यात उपमुख्यमंत्री अजितदादाना टार्गेट करने सुरु केले आहे. या हत्याकांडातील आरोपी फासावर गेले पाहिजे ही धनंजय मुंडे यांची सुरुवातीपासून भूमिका असताना या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याच्या भूमिकेत धस आले आहेत, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.