मुंबई-सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी बीड जिल्ह्यातील कथित गुन्हेगारीसंबंधी आणखी एक फोटो ट्विट केला. या फोटोमध्ये सुशील वाल्मीक कराड नामक तरुणाच्या कंबरेला पिस्तुल असल्याचे दिसत आहे. दमानिया यांनी या तरुणाच्या नावावर कोणताही शस्त्र परवाना नसल्याचा दावा केला आहे. हा तरुण मस्साजोग प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या वाल्मीक कराड यांचा मुलगा असल्याचे समजते.
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचे नाव आले आहे. यामुळे त्याची संवेदनशीलता वाढली आहे. विशेषतः या हत्याकांडामुळे हादरलेल्या बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी जिल्ह्यातील कथित गुन्हेगारी संपवण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी सुशील वाल्मीक कराडचा फोटो ट्विट केला आहे.
अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये सुशील वाल्मिक कराडचा फोटो ट्विट केला आहे. फोटोत सुशील कराड हा एका आलिशान कारच्या समोरील भागाला टेकून उभा आहे. त्यात त्याच्या कंबरेला पिस्तुल असल्याचे दिसून येत आहे. दमानिया यांनी अन्य एका फोटोद्वारे सदर गाडीची मालकी वाल्मीक बाबुराव कराड यांच्या नावे असल्याची बाबही निदर्शनास आणून दिली आहे. दमानिया आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘हा सुशील वाल्मीक कराड. याच्या नावावर कुठलाही शस्त्र परवाना नाही.’
उल्लेखनीय बाब म्हणजे, अंजली दमानिया यांनी अन्य एका ट्विटद्वारे डिगोळआबा गावचे सरपंच जयप्रकाश सोनवणे उर्फ बाळासाहेब सोनवणे यांचाही एक पिस्तुल असणारा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सोनवणे हवेत गोळीबार करताना दिसत आहेत. ते मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटोत असल्याचेही दिसून येत आहेत. ‘पिस्तूलंच पिस्तुलं… डिगोळआबा गावचा सरपंच याचे नाव जयप्रकाश सोनवणे उर्फ बाळासाहेब सोनवणे असे आहे. मला कळवण्यात आले आहे की ह्यांच्यावर खंडणी, अपहरण असे अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत. SP नवनीत कावत यांनी गुन्हे अहेत की नाही याची खात्री करावी आणि गुन्हा नोंदवावा’, असे दमानिया यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. दमानिया यांनी सोनवणे यांचा गोळीबार करतानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.
अंजली दमानिया यांनी माणिक फड यांचेही काही फोटो ट्विट केलेत. त्या या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मार्किंग केलेली व्यक्ती माणिक फड हे धनंजय मुंडे समर्थक समर्थक आहेत. मला कळवण्यात आले आहे की, हे हप्ते गोळा करणे, गरीब लोकांना त्रास देणे, ही कामे परळी लगत गाव आहे तिथे करतात. एसपी नवनीत कावत यांनी तपासून घ्यावे.’

