महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात मोठा घोटाळा–आकाने गरिबांच्या जमिनी सुद्धा नावावर केल्या
बीड-भाजप आमदार सुरेश धस यांनी आज बीड एसपींची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना खळबळजनक दावा केला आहे. बीडमधील टेंभूर्णी गावाच्या तिकडे एकाच व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाले असल्याचा त्यांनी दावा केला आहे. 9 अब्ज रुपयांचे ट्रान्झॅक्शन एका व्यक्तीच्या नावावर जर झाले असेल तर याच्यावर कोणत्या यंत्रणेने तपास केला पाहिजे तुम्हीच सांगा, असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.
आमदार सुरेश धस म्हणाले, एवढ्या मोठ्या प्रकरणात काम करणारे दोन अधिकारी होते, मी काही नाव सांगत नाही. एसपी साहेबांना मी नावे सांगितली आहेत. एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज म्हणल्यावर असे बाकीचे बरेचशे लोक आहेत. म्हणजे अब्जावधी रुपयात घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात झालेला आहे. यावर चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले आणि निष्क्रिय अधिकारी यात आणले, आरोपींचे जामीन करून देणे वगैरे काम सुरू आहे. तसेच या प्रकरणाची मलेशियामध्ये सुद्धा लिंक आहे. अशा गंभीर गुन्ह्यात सुद्धा अतिशय चुकीचे वागणारे पोलिस ठेवण्यात आले आहेत. अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलिस दल हे निष्क्रिय स्वरूपाचे दाखवले गेले.
आमदार सुरेश धस म्हणाले, मी माझे लेखी पत्र दिले आहे. बीड जिल्ह्यातील पोलिस दलातील पोलिसांची यादी मला द्या आणि त्यात यादीमध्ये बीड जिल्ह्यातील पोलिसांची संख्या बिंदु नामावली प्रमाणे आहे का आणि नसेल तर हे चूक आहे, हा अन्याय आहे आणि हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईल. त्याच्यावर योग्य ती कारवाई मुख्यमंत्री करतील. पुढे ते म्हणाले कोणी तरी यांच्या पाठीमागे आहे. आका सोडून कोण आहे यांच्या मागे. बीड जिल्ह्यातील कोणतेही प्रकरण घ्या त्यात आका.
आमदार सुरेश धस पुढे म्हणाले, आकाने गरिबांच्या जमिनी सुद्धा नावावर केल्या आहेत. तुम्ही जाऊन बघू शकता. शिरसाळा येथे सगळे गाळे गायरान जमिनीवर बांधण्यात आले आहेत म्हणून त्याचे अद्याप उद्घाटन होऊ शकले नाही. कोणी जर त्यावर तक्रार केली तर ते सगळे डीमोलिश होऊ शकते. माझ्या मते 1400 एकर आसपास गायरान जमीन शिरसाळा गावात आकांचे बगलबच्चे आहेत. 600 विटभट्ट्या तिथे आहेत त्यातील 300 वीटभट्ट्या या अनधिकृत असून गायरान जमिनीवर आहेत. तिथे एक मंदिर आहे देवीचे. तिथे आता जायलाच जागा राहिली नाही. तिथे बंजारा समाजाची जमीन होती, त्यांना तिथून उठवून यांनी तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले आहे.