नवरा – बायकोने मिळून मृतदेहाची लावली विल्हेवाट
मुंबई-कल्याणमधील एका 13 वर्षीय मुलीची अत्याचारानंतर हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीला न्यायालयाने गुरुवारी 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी आरोपीला त्याच्या पत्नीनेही मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोर्टाने तिचीही 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.यासंबंधीच्या वृत्तानुसार, मृत मुलगी सोमवारी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह मंगळवारी भिवंडी लगतच्या बापगाव परिसरात आढळला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची वेगवान चक्रे फिरवली. त्यांनी मुलीच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यात ती कुठेतरी जाताना दिसली. पण तेथून परत येताना दिसली नाही. त्यानंतर पोलिसांनी त्या भागात तपास केला असता एका घराच्या आसपास रक्ताचे डाग पडल्याचे आढळले. यामुळे त्यांचा संशय तिथे राहणाऱ्या विशाल गवळी नामक गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीवर बळावला.
पोलिसांनी विशालची पत्नी साक्षीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. त्यावर साक्षीने विशालने अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या केल्याची कबुली दिली. तिने दिलेल्या जबाबानुसार, आरोपी विशाल गवळीने सोमवारी सायंकाळी 5 च्या सुमारास आपल्या राहत्या घरी अल्पवयीन मुलीवर गैरकृत्य केले होते. त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह एका बॅगेत लपवला. सायंकाळी 7 च्या सुमारास बँकेत नोकरी करणाऱ्या साक्षीला त्याने झाला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकल्यानंतर साक्षी घाबरली.त्यानंतर दोघांनी मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांनी सर्वप्रथम घरातील रक्ताचे डाग पुसून टाकले. त्यानंतर रात्री 8.30 च्या सुमारास मित्राचा ऑटो बोलावला. त्यानंतर तो ऑटो त्याने स्वतः चालवत मुलीचा मृतदेह बापगाव भागात नेऊन फेकून दिला. तेथून परत येताना विशालने आधारवाडी चौकातील दारू खरेदी केली. त्यानंतर तेथूनच तो पत्नी साक्षीच्या माहेरी शेगाव येथे गेला, तर साक्षी घरी परतली.
पोलिसांनी विशाल गवळीला शेगाव येथून अटक केली. त्याला आज शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्याला 7 दिवसांची, तर साक्षीला 2 जानेवारीपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचे तीव्र पडसाद कल्याण परिसरात उमटत आहेत.

