पुणे-8 व 9 वर्षांच्या दोन लहान मुलींची हत्या करून त्यांचे मृतदेह खोलीतील पाण्याच्या टाकीत भरून ठेवल्याची भयंकर घटना पुण्याच्या खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील एका वस्तीत गुरुवारी सकाळी उजेडात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका 50 वर्षीय परप्रांतीय आरोपीला अटक केली आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, कार्तिकी सुनील मकवाने (9) व दुर्वा सुनील मकवाने (8) अशी मृत मुलींची नावे आहेत. त्या एकमेकांच्या सख्ख्या बहिणी आहेत. त्यांचे मृतदेह ते राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या परप्रांतीय मुलांच्या एका खोलीतील पाण्याच्या टाकीत आढळले. हे सर्व परप्रांतील तरुण एका स्थानिक बियर बारमध्ये काम करतात. मृत बहिणी बुधवारी दुपारी खेळताना अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. पण त्या सापडल्या नाही. अखेर त्यांच्या मोलमजुरी करणाऱ्या पालकांनी बुधवारी सायंकाळी खेड पोलिसांत मुली हरवल्याची तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलिसांनी आपल्या खबऱ्यांना सक्रिय केले. या खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मृत मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असणाऱ्या चाळी लगतच्या बारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली. तेथील एका पाण्याच्या टाकीत दोन्ही मुलींचे मृतदेह आढळले. त्यानंतर दोन्ही मृतदेह चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली.फौजदार मोरे पुढे म्हणाले, मृत मुलींवर अत्याचार झाला किंवा नाही हे लगेच सांगता येणार नाही. पण खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील धनराज बारमध्ये काम करणाऱ्या एका वेटरने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी जवळपास 50 वर्षीय असून, त्याला गुरुवारी पहाटे 4 च्या सुमारास पोलिसांनी पुण्यातील एका लॉजवरून अटक केली. सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे. मुलींच्या आईचे व वेटरचे प्रेमसंबंध होते. त्यातून वेटरने हे कृत्य केल्याचाही अंदाज या प्रकरणी व्यक्त केला जात आहे.