मॉस्को-कझाकस्तानमधील अकताऊ येथे बुधवारी सकाळी एक प्रवासी विमान कोसळले. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, विमानात 62 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर होते. यापैकी 28 जणांना वाचवण्यात यश आले आहे. 22 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन मुलांचा समावेश असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
या अपघातात 39 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. हे विमान अझरबैजानहून रशियाच्या चेचन्या प्रांताची राजधानी ग्रोझनीकडे जात होते. पण त्याला कझाकिस्तानच्या अकताऊ शहरापासून 3 किमी अंतरावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
वृत्तसंस्थेच्या मते, दाट धुक्यामुळे विमानाचा मार्ग बदलण्यात आला होता. वृत्तानुसार, विमानाने क्रॅश होण्यापूर्वी विमानतळावर अनेक फेऱ्या मारल्या होत्या. त्यानंतर त्याला आपत्कालीन लँडिंग करावी लागली.
अपघातग्रस्त विमान अझरबैझान एअरलाईन्सचे असल्याचे सांगितले जात आहे. सोसल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दिसून येत आहे की, विमान क्रॅश होताच त्याला आग लागली. बीबीसीच्या वृत्तानुसार, सध्या आग विझवण्यात आली आहे.