वल्लरी प्रकाशनच्या वतीने गोकर्ण आणि हरिप्रिया काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पुणे: कवितेचे बीजारोपण जरी कवीने केले, तरी ती फक्त एका व्यक्तीची राहत नाही. ज्याची अनुभव संपन्नता जास्त, त्याची कविता तेवढीच समृद्ध होते. निखळ कविता लिहिणे ही एक कला आहे, तर कवितेचे प्रभावी सादरीकरण हे शास्त्र आहे. कवीने दोन्ही गोष्टींत पारंगत असणे महत्वाचे असते कारण प्रेक्षकांसमोर सादरीकरण करताना अभ्यासपूर्ण दृष्टिकोन गरजेचा आहे, असे मत ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण यांनी व्यक्त केले.
वल्लरी प्रकाशनच्या वतीने व्यंकटेश कल्याणकर संपादित “गोकर्ण” या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे आणि डॉ. सारिका बावस्कर यांच्या “हरिप्रिया” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाले. यावेळी गझलकार आनंद पेंढारकर, कवयित्री कांचन सावंत, साहित्यिका मानसी चिटणीस, संपादक व्यंकटेश कल्याणकर, कवयित्री डॉ. सारिका बावस्कर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आनंद पेंढारकर म्हणाले, कविता लिहिताना कवीने आधीच्या कवींनी लिहिलेल्या कवितांचा अभ्यास करणे, स्वतःच्या कवितांना वारंवार वाचून त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच भाषेचा गाढा अभ्यास असणे महत्त्वाचे आहे. कवी सामाजिक भान ठेवून लिहितो, तेव्हा त्याच्या कवितेत वास्तव अधिक स्पष्टपणे दिसते, त्याकरीता त्याला सामाजिक भान असणे देखील गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
कांचन सावंत म्हणाल्या, “कविता म्हणजे केवळ प्रेम किंवा विरह नव्हे. याहूनही व्यापक विषय कवितेचे होऊ शकतात. त्याकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून कविता आपोआप सुचू लागते, त्यासाठी वेगळा विचार करण्याची गरज नसते, असेही त्यांनी सांगितले.
व्यंकटेश कल्याणकर म्हणाले, तंत्रज्ञानाने जग जवळ आणले असले तरी माणसे एकमेकांपासून दुरावत चालली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने गोकर्ण या शब्दावर १० सेकंदांत १० कविता मिळतील, परंतु स्वतःच्या जगण्याला स्वतःच्या शब्दांत मांडणे ही खरी कविता आहे. गोकर्ण हा संग्रह कविता लिहिणाऱ्या कविच्या जीवनातील प्रत्येकासाठी समर्पित आहे.
प्रज्ञा कल्याणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर ज्योती इनामदार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन गोंगटल्लू, आर्या इनामदार, अनिष कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

