पुणे : शिवाजी रोडवर एका मद्यधुंद कारचालकाने मोटारसायकलला धडक दिली. त्यानंतर त्याने पळून जाताना अनेक वाहनांना धडक दिली. शेवटी त्याला दीप बंगला चौकात लोकांनी अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले. चतु:श्रृंगी पोलिसांनी त्याची मेडिकल टेस्ट करुन त्याला पुढील कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात दिले.
दयानंद केदारी असे या कारचालकाचे नाव आहे. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी सांगितले की, शिवाजी रोडवर प्यारा हॉटेलसमोर एका कारचालकाने मोटारसायकलला धडक दिली होती. या अपघातानंतर कारचालक पळून जात असताना त्याने आणखी काही वाहनांना धडक दिली. मोटारसायकलचालकाने त्याचा पाठलाग केला. त्याला दीप बंगला चौकात अडविले. तेथे लोकांनी त्याला पकडून ठेवून चतु:श्रृंगी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याची मेडिकल टेस्ट करुन पुढील कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात दिले.
खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले की, हा कारचालक एका हॉटेलमध्ये किचन मॅनेजर आहे. तो दारुच्या नशेत कार चालवत असताना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्याची मोटारसायकलला धडक बसली. त्यानंतर त्याने अनेक वाहनांना धडक दिली. परंतु, ही धडक किरकोळ असल्याने कोणीही तक्रार न करता निघून गेले. खाली पडलेल्या मोटार सायकलचालकाने या कारचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यात पळून जाताना त्याने आणखी काही जणांना धडक दिली. दीप बंगला चौकात त्याला लोकांनी पकडले. चतु:श्रृंगी पोलिसांनी त्याला खडक पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्यावर कारवाई केली जात आहे