पुणे-साधारण १ ते १५ जानेवारीपर्यंत सरकार नियमित कामाला लागलेले असेल. त्यांच्यापुढचा प्राधान्याचा विषय पुणे महापालिकेचे विभाजन हाच असेल. त्यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.मागील अडीच वर्षे रखडलेल्या महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधीच शक्यतो हा निर्णय होईल, असेही ते म्हणाले.
श्रमिक पत्रकार संघाने पुणे शहरातील नवनिर्वाचित आमदारांचे पत्रकारांबरोबर वार्तालापाचे आयोजन मंगळवारी सकाळी पत्रकार संघात केले होते. पाटील यांच्यासमवेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, बापू पठारे, सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते. हेमंत रासणे व सुनील कांबळे या आमदारांनी कामामुळे शहराबाहेर असल्याने उपस्थित राहता येणार नाही, असे कळविले होते. संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी आमदारांचे स्वागत केले. पुण्यातील वाहतूक, पाणी, गुन्हेगारी, नव्याने सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे होणाऱ्या अडचणी, अशा अनेकविध समस्यांना स्पर्श करत आमदारांनी त्यावर काय कामकाज सुरू आहे याची माहितीही दिली. मेट्रोचे जाळे वाढविण्यात भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, महापालिकेची निवडणूकच नसल्याने नगरसेवक व नागरिक यांच्यात संवाद राहिला नाही. आमदारांची नसलेली कामे आमदारांना करावी लागत आहेत. मात्र, आता सरकार लवकरच कामकाजाला लागेल. त्यानंतर काही विषय प्राधान्याने घेण्यात येणार आहेत. त्यात हाही विषय आहे. मेट्रो, नदी सुधार, ड्रेनेजच्या पाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प, असे विषय आमदारांशी संबंधित असतात. पुण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. मुळशी धरणाबाबत सरकार व टाटा कंपनी यांच्यात बोलणी सुरू आहे. आता धरणातून वीज तयार होत नाही. त्यामुळे ‘धरणच ताब्यात द्या’ अशी आमची मागणी आहे. तसे झाले तर पुण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेतली तरीही सुटू शकेल.
महापालिकेचे विभाजन होणे गरजेचे आहे. मात्र, त्यात राजकीय सामाजिक, भौगोलिक असे अनेक विषय गुंतलेले आहेत. त्यामुळे यावर व्यापक चर्चा अपेक्षित आहे. नावांचा प्रश्न अशा वेळी अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यातही पुणे नावाला इतिहास आहे. त्यामुळे पुणे नावाचा समावेश असलाच पाहिजे, याबाबत सगळेच आग्रही असणार. अशा अनेक गोष्टींचा साधकबाधक चर्चा झाल्यानंतरच महापालिकेच्या विभाजनाचा निर्णय होईल, असे पाटील यांनी सांगितले.
पुणे शहराच्या समस्या हा विषय असला तरी राजकीय प्रश्न येणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे चंद्रकांत पाटील यांना पुण्याचा दादा कोण? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी हा जटिल प्रश्न आहे, असे उत्तर दिले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डोके सुपीक आहे. २३७ इतक्या मोठ्या संख्येने प्रथमच आमदार आहेत, त्यांनी बरोबर मंत्रिमंडळ तयार केले. आता हाही प्रश्न ते समाधानकारक पद्धतीने निकाली काढतील, असे पाटील म्हणाले.
वाहतुकीच्या कोंडीने संपूर्ण शहर त्रस्त आहे. त्यासाठीच मी येत्या ५ वर्षांत स्वारगेट ते खडकवासला या मेट्रोसाठी प्रयत्नशील आहे. नागरिक किंवा पत्रकार तक्रारी सांगतात, काही विषय समोर आणतात, त्याचा कधी राग येत नाही. कामाला संधी यादृष्टीने आम्ही त्याकडे पाहात असतो. त्या कामांचा पाठपुरावा केली की कामे मार्गी लागतात, असा माझा अनुभव आहे. -भीमराव तापकीर, आमदार, खडकवासला
मतदारसंघातील बसस्थानकाचा प्रश्न कालच आम्ही सोडवला आहे. तसेच वाहतूक प्रश्न गंभीर होत आहे. त्यासाठी नगरविकास मंत्री आता पुण्याचे आहेत, त्यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवू. रिंगरोड होणार आहे, तो लवकर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मेट्रोमुळे देखील वाहतुकीवरील बराचसा ताण कमी होऊ लागला आहे.- आमदार सिद्धार्थ शिरोळे
पुण्याचा विस्तार प्रचंड होत आहे. तो कुठेतरी मर्यादित करायला हवा. पुणे वाढत असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रिंगरोडच्या बाहेर पुण्याची हद्द वाढणार नाही, असे काही धोरण करायला हवे. आपण ठोस भूमिका घेतली नाही तर पुणे वाढतच राहील. बिल्डर बांधकामे करतात, पण पाण्याची समस्या मात्र पाहिली जात नाही. वाहतूक हा एक गहन प्रश्न आहे. त्यावर काम करणे अपेक्षित आहे. रिंगरोडला जोडणारे रस्ते बनवणे गरजेचे आहे. – आमदार बापू पठारे
पुण्याचा झपाट्याने होणारा विकास आपण पाहतोय. त्यासाठी आपण भविष्यासाठी योग्य नियोजन करत आहोत. आपल्याकडे त्याचा आराखडा आहे. मेट्रो केली आहे, रिंगरोड करत आहोत. त्यामुळे बरेचसे प्रश्न सुटणार आहेत. पुण्याचा विकास २०५० पर्यंत नियोजनबद्ध झालेला असेल. समाविष्ट गावांचाही प्रश्न असून, तेथेही योग्य पायाभूत सुविधा उभ्या करणार आहोत. – नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ
वाहतुकीच्या समस्येवर सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी मेट्रोचे जाळे वाढविणे हा उपाय आहे. आमचे त्याकडे लक्ष आहे. पाणी समस्येवर आधी महापालिकेने वितरणातील गळती थांबविणे आहे. वाढती लोकसंख्या हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी नागरी सुविधा तयार करणे, त्यांची कार्यक्षमता राखणे, या दृष्टीने काम होणे गरजेचे आहे. ते व्हावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. – चेतन तुपे, आमदार, हडपसर