अमनोरा येस फाउंडेशन आणि अमनोरा सिटीझन सोशल वाॅरियर्स अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट विद्या’ ची वर्षापूर्ती
पुणे : आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी महिला इतरांच्या घरातील धुणी भांडी करणे, त्यांच्या मुलांना सांभाळणे हे मोठे आव्हानात्मक, कष्टाचे काम करतात. तुम्ही करत असलेल्या या कष्टाचे चीज करायचे असेल तर तुमच्या मुलांना तुम्ही करत असलेल्या काबाडकष्टाची जाणीव करून देणे आवश्यक आहे, त्याशिवाय त्यांचे उज्वल भविष्य घडणार नाही, असे मत अमनोरा येस फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी केले.
अमनोरा टाउनशिप मध्ये घरकाम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी अमनोरा येस फाऊंडेशनच्या वतीने आणि अमनोरा सिटीझन सोशल वाॅरियर्स अंतर्गत ‘प्रोजेक्ट विद्या’ हा उपक्रम राबविण्यात येतो, या प्रोजेक्टच्या वर्षपूर्ती निमित्त त्या मुलांसाठी आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रमात देशपांडे बोलत होते. यावेळी अमनोरा येस फाऊंडेशनचे विवेक कुलकर्णी, पदाधिकारी, अमनोरा मधील रहिवासी उपस्थित होते.
अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, अमनोरा टाऊनशिप मध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना अवंतिका असे संबोधले जाते. प्रोजेक्ट विद्या अंतर्गत फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्पोकन इंग्लिश, पुणे दर्शन सह अन्य उपक्रमात मुलांचा सहभाग आमचा उत्साह वाढवणारा आहे. आज या विशेष कार्यक्रमात ४० हून अधिक मुलं – मुली आपली कला सादर करत आहेत आमची इच्छा आहे की पुढच्या वर्षी ही संख्या शंभर पर्यंत पोहोचली पाहिजे. आम्ही फाउंडेशनच्या वतीने मुलांना मदत म्हणून नव्हे राष्ट्रासाठी गुंतवणूक या भावनेतून आर्थिक, शैक्षणिक मदत करतो असेही देशपांडे यांनी नमूद केले.
या महिलांच्या मदतीने टाउनशिप मध्ये पाणी बचत मोहीम राबविण्यात येत असून त्याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळत असल्याचे अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले. या पाणी बचतीच्या माध्यमातून आमच्या अवंतिका लाखों कार्बन फुटप्रिंट कमी करत असल्याचे नमूद करताना प्रती व्यक्ती किमान २५ लीटर पाणी वाचवण्यात यश येत असल्याचे सांगितले. या महिला करत असलेल्या जन जागृतीमुळे आम्ही टँकर मागवत नाही. पाणी बचती मुळे वीजवापर कमी झाला आहे. यामुळे पाणी बचत हा उपक्रम संपूर्ण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
अमनोरा सिटीजन सोशल वॉरियर्स ही संस्था अमनोरा मधील नागरिकांनी स्थापन केली आहे. या मार्फत अवंतिकांच्या मुलांना इंग्रजी, गणित आणि विज्ञान असे विषय त्याच बरोबर विविध कलागुणांना वाव देण्यासाठी उपक्रम राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगला बदल दिसून येत आहे. वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुलांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच ग्लोबल वॉर्मिंग, पाणीबचत, वाहतूक शिस्त, सोशल मीडियाचा अतिवापर, राष्ट्रप्रेम या विषयावर मुलांनी सादरीकरण केले.
प्रोजेक्ट विद्या या उपक्रमामध्ये शशी अग्रवाल, सपना अग्रवाल, स्वाती प्रदीप, हर्षा गाजरे, कनिका शर्मा, स्वाती पेंडकर, योगिनी पटवारे, कल्पना सैंदाणे या नागरिकांनी वेगवेगळ्या विषयांचे वर्ग घेतले.