मुंबई- काही दिवसांपूर्वीच अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लवकरच वर्ग करण्यात येणार, अशी माहिती दिली होती. त्यानंतर योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत. लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कमेत वाढ करुन 2100 रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीच्या वतीने देण्यात आले होते. त्यामुळे आता सहावा हप्ता 2100 रुपये येणार की 1500 रुपये येणार, अशी चर्चा महिलांमध्ये सुरू होती. दरम्यान, आता सहावा हप्ता हा 1500 रुपये प्रमाणेच येणार असल्याचे सांगितले जात आहे.
या महिन्यात दोन टप्प्यात महिलांना पैसे मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांच्या खात्यात 1500 रुपयांप्रमाणे पैसे जमा होणार आहेत. तर निवडणुकीआधी आलेल्या 25 लाख नवीन अर्जाची स्क्रुटिनी सुरू आहे, ती पूर्ण झाल्यानंतर या महिलांच्या खात्यात हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्याबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सांगितले होते. त्यानुसार राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा मिळू शकेल, अशी स्थिती आहे. दरम्यान, राज्याचा अर्थसंकल्प हा 3 मार्च 2025 रोजी सादर करणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या हप्त्यासाठी मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान, लाडक्या बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्या जमा करण्यात आली आहे. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणे 7500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीमुळे नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबर महिन्यातच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.