ग्रंथ पारायण दिंडी, पुणेच्या वतीने तेरा लक्ष रामरक्षा स्तोत्र पठण संकल्प पूर्ती कृतज्ञता सोहळा
पुणे : लहानपणी लागलेल्या चांगल्या सवयी नेटाने पुढे चालवल्या तर त्याचे परिणाम भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरतात. मुलांमध्ये चांगल्या सवयी रुजवण्यासाठी पालकांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. शाळेत शिकवलेल्या गोष्टींचा प्रभाव मोठे झाल्यानंतरही जाणवतो. लहान वयात झालेल्या संस्कारांवर मुलांचे भविष्य अवलंबून असते, असे मत ज्येष्ठ लेखक आनंद माडगूळकर यांनी व्यक्त केले.
ग्रंथ पारायण दिंडी, पुणेच्या वतीने तेरा लक्ष रामरक्षा स्तोत्र पठण संकल्प पूर्ती कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी साताऱ्यातील समर्थ सेवा सज्जनगडचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी, जनता सहकारी बँकेचे संचालक अभय माटे, ग्रंथ पारायण दिंडीचे वीरेंद्र कुंटे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात आशिष केसकर यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या गीतरामायणाच्या सादरीकरणाचा अनुभव कथन केला.
योगेशबुवा रामदासी म्हणाले, कोणतेही कार्य आपण स्वतः करत नाही; भगवंत ते आपल्याकडून करवून घेतो. इतक्या लहान वयात अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या चरणी गीतरामायणाचे सादरीकरण करण्याची संधी या चिमुकल्यांना परमेश्वराने दिली आहे. आज अनेक मुलांना रामरक्षा स्तोत्र काय आहे हेही माहिती नाही. काळाच्या ओघात हे मागे पडत आहे. मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल.
वीरेंद्र कुंटे यांनी सांगितले की, पुण्यातील बालचमूंनी भव्य रामरक्षा पठण व गीतरामायणाचे सादरीकरण अयोध्या राम मंदिरात केले. तब्बल तेरा लक्ष रामरक्षा स्तोत्र पठणाचा संकल्प पूर्ण झाला. या संकल्प पूर्तीनंतर जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले.