पुणे : २१/२२/२३ फेब्रुवारी२०२५ या काळात, सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी ( तालकटोरा स्टेडियम) नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. दिल्लीत ७१ वर्षांनी होणाऱ्या या ऐतिहासिक संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.त्या निमित्ताने त्यांचा शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सरहद् आणि महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थांच्या वतीने माधवराव पटवर्धन सभागृह,महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे ४११०३० येथे ज्येष्ठ विचारवंत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ रावसाहेब कसबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे तसेच या प्रसंगी १९५४ साली दिल्लीत झालेल्या ३७ व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ आणि संमेलनाचे उद्घाटक पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाच्या ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी संपादित केलेल्या ‘ दिल्लीतील साहित्य चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या प्रसंगी साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ पी. डी. पाटील, माजी आमदार अनंत गाडगीळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.