पुणे, दि. २४ : ग्राहकांना कायदे व हक्कांची माहिती व जाणीव व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे अपर जिल्हाधिकारी डॉ. सुहास मापारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष विलास लेले, पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे पाटील, सायबर क्राईम सेलचे पोलीस उपनिरिक्षक तुषार भोसले उपस्थित होते.
श्री. लेले म्हणाले, आर्थिक शोषण टाळण्यासाठी ग्राहकांनी सजग राहून संघटित होणे गरजेचे आहे. फसवणुकीचे प्रकार बदलले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी संघटित झाल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे सांगितले.
श्री. भोसले यांनी सायबर क्राईमबद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले की, सध्या ऑनलाईन पद्धतीने लोकांची आर्थिक फसवणूक होत असून ती कशी थांबवता येईल, याबाबत सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले.
प्रदर्शनात विधी सेवा प्राधिकरण, भारतीय जीवन विमा, वाहतूक नियंत्रण, पीएमपीएमएल, प्रादेशिक परिवहन अधिकारी, एसबीआय इन्शुरन्स, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, बीएसएनएल, जिल्हा कृषी अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, अग्रणी बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, राज्य आरोग्य प्रयोगशाळा, अन्नधान्य वितरण कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैधमापन शास्त्र, पोलीस सायबर सेल, जिल्हा व सत्र न्यायालय, भारतीय मानक ब्युरो, अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने स्टॉल लावण्यात आले होते.