बारामती – आजवर जे सिनेमात गुन्हेगारीचे चित्र पाहायला मिळायचे ते आता महाराष्ट्रात वास्तवात दिसू लागले आहे. या घटना महाराष्ट्राला शिभणाऱ्या नाही. आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल अशी भीती मला वाटत आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या भविष्याची काळजी व्यक्त केली आहे. परभणी येथील घटनेवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, परभणीतील घटना महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे. अर्थात या ठिकाणी शरद पवार गेल्यानंतर राज्यातील इतर नेते, लोक गेले तोपर्यंत कोणीही त्या ठिकाणी भेट द्यायला गेले नव्हते, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करत चिंता व्यक्त केली आहे. तसेच पक्षाची 8 व 9 जानेवारी रोजी मुंबईत बैठक होणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे. यात पक्षाची आगामी भूमिका ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,सुप्रिया सुळे म्हणाल्या, फक्त पोलिसांची बदली करून चालणार नाही. त्यापेक्षा कोण आरोपी आहे हे शोधले पाहिजे. बीड आणि परभणीमध्ये ज्या घटना झाल्या त्यावर विश्वास बसत नाही. जे सिनेमात पाहिले ते वास्तव महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. पुढचा महाराष्ट्र कसा असेल अशी भीती वाटत आहे, मला कधीही भीती वाटली नाही पण आता वाटत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत, त्यांनी महाराष्ट्राला न्याय द्यावा. सुरेश धस, नमित मुंदडा यांचे कौतुक आहे. करण राजकीय मतभेद बाजूला ठेऊन लढण्याची आज आवश्यकता आहे. मात्र, धनंजय मुंडे यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, जेव्हा गुन्हेगारी वाढते तेव्हा आर्थिक विकास मंदावतो. केंद्र सरकारचा आजवरचा डेटा देखील हेच सांगतो. महाराष्ट्रात वाढती गुन्हेगारी ही आर्थकारणाला खिळ बसवणारी ठरले असा धोका असल्याचे सुळे म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी मराठी साहित्य संमेलनबद्दल देखील भाष्य केले. त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील साहित्य संमेलनाला येणार आहेत. साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वेसाठी अश्विनी वैष्णव प्रयत्न करतील यासाठी आम्ही मिळून प्रयत्न केला आहे तसेच दिल्लीत होणारे हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यावर आमचा भर राहणार आहे.