विद्यार्थ्यांनी लावले सुमारे ३० स्टॉल
पुणे : विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान प्राप्त व्हावे आणि गणित विषयाच्या मूलभूत क्रियांना चालना मिळावी, या उद्देशाने बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. मराठी शाळेच्या प्रांगणात ‘बाल आनंद मेळावा’ आयोजित करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ, भाजीपाला, शैक्षणिक साहित्य, खेळण्यांची छोटी दुकाने मांडून व्यवहारज्ञानाचा अनुभव घेतला. याशिवाय नेमबाजी, रिंग फेकणे आणि गंमत जत्रेतील विविध खेळांमधून मुलांनी आनंद घेतला.

शिक्षण प्रसारक मंडळीच्या नू.म.वि. मराठी शाळेच्या प्रांगणात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन शि. प्र. मंडळीचे श्रीकृष्ण चितळे, पराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका माया सोयाम, पर्णल ठाकूर हे उपस्थित होते.
पराग ठाकूर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक जडणघडणीबरोबर स्वसंरक्षणासाठी शाळेत लाठी-काठीचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचप्रमाणे, आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांचा संपर्क वाढावा यासाठी कॉम्प्युटर लॅब सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा याकरिता आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सुमारे ३० स्टॉल लावले होते. विद्यार्थी व पालकांनी मिळून धान्य, कडधान्य, भाजीपाला, शैक्षणिक साहित्य, खेळणी, तसेच घरी बनवलेले केक, चॉकलेट, बिस्किट, मोदक यांसारख्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शन सादर केले. रिंग फेकणे, बॉलने ग्लास पाडणे, पाळणा, जम्पिंग जॅक अशा खेळांमधून उपस्थितांनी आनंद लुटला.

