पहिल्या रोटरी डिस्ट्रिक्ट साहित्य संमेलनात होणार गौरव
पुणे : जानेवारीत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड देऊन गौरव केला जाणार आहे, अशी माहिती प्रांतपाल 3131चे शितल शहा यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
शनिवार, दि. 4 आणि रविवार, दि. 5 जानेवारी 2025 या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यवसायिक सेवा देताना सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीस मानाचे रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड देऊन गौरविले जाते. संमेलनाचे निमित्त साधून फडणीस यांचा गौरव केला जाणार आहे.
वयाच्या शंभरीत पदार्पण केलेले शि. द. फडणीस हे आजही तेवढ्याच उर्जेने आणि उमेदिने कार्यरत आहेत. आजही त्यांची व्यंगचित्रे विविध माध्यमांधून प्रसिद्ध होत असून ते आपल्या व्यंगचित्रांद्वारे लोकांना हसवत आहेत. व्यंगचित्रे समाजातील विसंगतीवर टिकात्मक पद्धतीने भाष्य करणारी असतात हा समज फडणीस यांच्या व्यंगचित्रांमधून खोटा ठरला आहे. त्यांच्या शब्दविरहित चित्रांनी खमंग, खुसखुशीत विनोद निर्मिती केली आहे. अनेक लेखकांची पुस्तके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांच्या मख्यपृष्ठांद्वारे त्यांची व्यंगचित्रे समाजमनास भिडली आहेत. शि. द. फडणीस यांच्या प्रयत्नाने कायदाच्या माध्यमातून चित्रकारांना कॉपीराईटचे हक्क मिळवून दिले आहेत. शि. द. फडणीस यांची व्यंगचित्रे देश-परदेशातील आर्ट गॅलरीमध्ये झळकली आहेत.

