पुणे- काल रात्री 12.30 च्या सुमारास पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यातील या अपघाताने सगळीकडे खळबळ उडाली आहे.वाघोली परिसरात केसनंद फाट्यावर डंपर चालकाने हा अपघात केला आहे. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. या अपघातात 9 जणांना चिरडले आहे. यामध्ये दोन लहान मुले असल्याची माहिती मिळाली आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहे. या जखमींधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
या तिघांचा मृत्यू
- विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
- वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
- वैभव रितेश पवार वय 2 वर्ष
हे 6 जण जखमी
- जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
- रिनिशा विनोद पवार 18
- रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
- नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
- दर्शन संजय वैराळ, वय 18
- आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे
आरोपी – डंपर चालक गजानन शंकर तोट्रे, 26 वर्षे रा. नांदेड याला ताब्यात घेतला असून मेडिकल करण्यासाठी रुग्णालयात नेले आहे. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमींना प्राथमिक उपचार आयनॉक्स हॉस्पिटल येथे करून ससून रुग्णालयात रवाना केले आहे. मृतदेह आयनॉक्स हॉस्पिटलमधून ससून येथे पाठवले आहेत.
अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. रविवारी रात्री ते अमरावतीहून कामानिमित्त आले होते. या पदपथावर एकूण 12 जण झोपले होते. बाकीचे लोक फूटपाथच्या बाजूला झोपडीत झोपले होते. भरधाव डंपर थेट फूटपाथवर जाऊन झोपलेल्या लोकांना चिरडले.
प्रत्यक्षदर्शी म्हणाला की, आम्ही 40 जण कामासाठी इथे पुण्याते आलो आहोत, इकडे काम भेटतं म्हणून आम्ही अमरावती वरून पुण्याला काल रात्री आलो. आम्ही चार वर्षाआधी पण इथे काम करत होतो. आम्ही इथेच राहतो. गेल्या चार वर्षापासून आम्ही इथून कुठे गेलो नाही, आम्ही इथे झोपल्यानंतर डंपर चालक सरळ अंगावर आला, आणि बाळांच्या अंगावर घातला.
दुसरा प्रत्यक्षदर्शीं म्हणाला की, आम्ही कालच अमरावती वरून पुण्याला आलो होतो. आम्ही सर्व जण झोपलेले असताना बारा एक वाजण्याच्या सुमारास डंपर फुटपाथवरून आत घुसल्यानंतर आरडाओरडा सुरू झाली. त्यानंतर आम्ही सगळे उठलो डंपरचालकाने मुलांना चिरडले होते. तसाच तो पुढे गेला. तर तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेने सांगितले की, जर तो डंपर दुसऱ्या बाजुला वळला असता तर आणखी 15-16 जणांचा बळी गेला असता. तिथे असलेल्या अनेकांनी आरडा-ओरड केली त्यामुळे अनेक जण वाचले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. डंपरचालकाने दारू पिलेली होती. त्यांनी मुलांच्या अंगावरून वाहन घातलं.